ठाणे : घोडबंदर येथील आनंदनगर भागात गुरुवारी रात्री वाहनांचा भार वाढल्याने घोडबंदर मार्गावर आनंदनगर ते कापूरबावडी आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर माजिवडा ते कोपरी उड्डाणपूलापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. या वाहतुक कोंडीमुळे मुंबईहून ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले. अवघ्या पाच ते १० मिनीटांच्या अंतरांसाठी किमान पाऊण तास लागत होता.
पूर्व द्रुतगती महामार्ग, घोडबंदर भागातून हजारो वाहनांची वाहतुक होते. गुरुवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास आनंदनगर भागात अचानक वाहतुक विरुद्ध दिशेने सुरु झाल्याने आणि पावसामुळे वाहतुक कोंडी झाली. त्यातच मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरु असल्याने कोंडीत भर पडली. या मार्गावर आनंदनगर ते कापूरबावडी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर पूर्व द्रुतगती महामार्गावर माजिवडा ते कोपरी रेल्वे उड्डाणपूलापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतुक कोंडीमुळे मुंबईहून ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.
वाहन चालकांनी अंतर्गत मार्गावरून प्रवास करण्याचा निर्णय घेतला. परंतु अंतर्गत मार्गावरही कोंडी झाली होती. रात्री ८.३० वाजतानंतरही कोंडी कायम होती. रस्त्याची वाईट अवस्था त्यात कोंडी यामुळे प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागला. वाहन चालकांना अवघ्या पाच ते १० मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी किमान पाऊण तास लागला. गेल्याकाही दिवसांपासून वाहतुक कोंडीमुळे ठाणेकर त्रस्त झाले आहेत. त्यातच वाहतुक कोंडी झाल्याने वाहन चालकांकडून संताप व्यक्त केला जात होता.