ठाणे – ठाण्यातील तीनहात नाका येथे बोकडाची वाहतूक करणाऱ्या रिक्षावर करण्यात आलेल्या ई-चलान कारवाईमुळे बनावट नंबरच्या रिक्षेचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ऑनलाईन दंडाची नोटीस मूळ रिक्षामालकाकडे पोहोचताच एकाच नोंदणी क्रमांकाच्या दोन रिक्षा अस्तित्वात असल्याचे समोर आले. या प्रकरणी वाहतूक पोलिसांनी बनावट रिक्षा जप्त करून चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती वाहतुक उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.
ठाण्यातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जाणाऱ्या तीनहात नाका सिग्नल येथे नौपाडा वाहतूक पोलीस निरीक्षक गौरी मोरे आणि त्यांचे पथक वाहतूक नियमनाचे काम करत होते. यावेळी घोडबंदर रोड दिशेकडील मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने पोलीस नाईक जितेंद्र पाटील, पोलीस हवालदार अभिजित भाट आणि चालक पोलीस शिपाई स्वानंद माने हे कोंडी सोडवण्यासाठी गेले होते.
दरम्यान, एमएच ०४ एचझेड ४२९० क्रमांकाच्या एका रिक्षामधून प्रवाशांऐवजी बेकायदेशीरपणे बोकडाची वाहतूक केली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार संबंधित रिक्षाचालकावर ई-चलानद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र, काही वेळातच मुंब्रा येथील एक रिक्षाचालक स्वतःची रिक्षा घेऊन घटनास्थळी दाखल झाला. ‘माझी रिक्षा मुंब्रा येथे असताना मला दंड कसा आला?’ असा सवाल त्याने पोलिसांना केला. यानंतर पोलिसांनी दोन्ही रिक्षांची पडताळणी केली असता एकाच नोंदणी क्रमांकाच्या दोन रिक्षा आढळून आल्या.
तपासात संबंधित क्रमांकाची मूळ रिक्षा मुंब्रा येथील शेर मोहम्मद शहा मोहम्मद यांच्या वडिलांच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाले. तर दुसऱ्या रिक्षेवर बनावटपणे तोच क्रमांक वापरून व्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले. या प्रकाराची दखल घेत वाहतूक पोलिसांनी बनावट रिक्षा जप्त केली असून संबंधित चालकाविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, एका बोकडाच्या वाहतुकीवर झालेल्या कारवाईमुळे बनावट नंबरच्या रिक्षेचा पर्दाफाश झाला असून या अनोख्या घटनेची शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
