ठाणे : व्हीआयपी ओळख दर्शविण्यासाठी वाहनांवर विविध प्रकारचे स्टिकर्स आणि बोर्ड लावण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असतानाच, त्यापाठोपाठ आता मंत्रालयाशी संबंधित किंवा मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहन असल्याचे भासविण्यासाठी लाल रंगाच्या अक्षरात ‘एम’ असे स्टिकर लावले जात आहेत. ठाण्यातील अशाचप्रकारच्या एका खासगी वाहनांवर असे स्टिकर दिसून येत असून या वाहनांवर मात्र मोटार वाहन नियम डावलून वाहन क्रमांक पाटी लावण्यात आलेले आहे. हे वाहन बिनदिक्तपणे शहरात फिरत असून अशा वाहनांवर आता कारवाई करण्याची मागणी होत आहे.

पोलिस कारवाई टाळण्यासाठी किंवा व्हीआयपी ओळख दर्शविण्यासाठी वाहनांवर विविध प्रकारचे स्टिकर्स लावण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. काही वर्षांपुर्वी ठाणे महापालिका क्षेत्रात यापुर्वी नगरसेवक स्टिकरची वाहने मोठ्या प्रमाणात आढळून येत होती. नगरसेवक नसलेली व्यक्तीही अशा स्टिकरचा वापर करत होती. यासाठी महापालिकेचा लोगो लावला जात होता. अशा वाहनांचा गैरवापर होऊ नये यासाठी नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत अशा वाहनांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर कारवाई सुरू होताच अशी वाहने रस्त्यावर कमी दिसून लागली. मंत्रालयातील किंवा मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहन असल्याचे भासविण्यासाठी अनेक वाहनांवर ‘विधिमंडळ’ असे स्टिकर लावण्यात आलेले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून यामध्ये आणखी एक नवीन प्रकार समोर आला असून काही वाहनांवर लाल रंगात ठळक ‘एम’ अक्षर असलेले स्टिकर लावण्यात येत आहेत. हे वाहन मंत्रालयाशी संबंधित आहे किंवा मंत्र्यांच्या ताफ्यातील अधिकृत वाहन आहे, असा भास निर्माण करण्यासाठी हे स्टिकर वापरले जात आहे. प्रत्यक्षात अशा प्रकारच्या स्टिकर्सना कोणतीही अधिकृत मान्यता नसतानाही ते लावून रस्त्यावर मुक्तपणे वावर होत असल्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन होत आहे. अशाच प्रकारचे एक वाहन नुकतेच ठाणे शहरात फिरताना आढळून आले. या वाहनावर लाल अक्षरात ‘एम’ स्टिकर लावलेले असून वाहन क्रमांक पाटीही मोटार वाहन कायद्यानुसार बसविण्यात आलेली नाही.

मोटार वाहन कायद्यानुसार नंबर प्लेटचे स्वरूप, रंग व फॉन्ट निश्चित असून त्यात बदल करणेही गुन्हा मानला जातो. परंतु ठाण्यात एका टोयोटा फॉर्च्युनर वाहनावर नियम डावलून वाहन क्रमांकाची पाटी लावण्यात आली आहे. महाराष्ट्र ०४ एलएच १ असा वाहनाचा क्रमांक असून तो इंग्रजी भाषेत आहे. या वाहन पाटीवर सर्व अक्षरे छोट्या फॉन्टमध्ये देण्यात आली आहेत तर, या पाटीवर एक क्रमांक ठळक मोठ्या अंकात लिहिण्यात आला आहे. या वाहनावर लाल अक्षरात ‘एम’ स्टिकर लावलेले असून या वाहनाचे मालक नेहरिका मोहन खैरनार हे असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन सुत्रांनी दिली. अशा प्रकारच्या स्टिकर्समुळे सामान्य नागरिकांची दिशाभूल होण्याबरोबरच कायद्याचा गैरवापर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संबंधित यंत्रणांनी याकडे लक्ष देऊन नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

नियमानुसार, वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरसी ) असणे बंधनकारक आहे. मात्र, सदर वाहनाला तशी नंबरप्लेट दिसून येत नसून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. – हेमांगिनी पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे