जमिनीच्या कामासाठी वारंवार फे-या मारूनदेखील काम मार्गी लागत नसल्याने हताश झालेल्या शेतकऱ्याने मुरबाड तहसील कार्यालयाच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. अशोक शंकर देसले असे या शेतकऱ्याचे नाव असून या प्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात तहसीलदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणी देसाई यांच्या नातेवाईकांनी यांनी केली.
मुरबाडच्या शेलगाव येथे राहणारे शेतकरी अशोक शंकर देसले यांच्या जमीनीच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून जमीन हडप करण्यात आली होती. या प्रकरणी अशोक देसले हे गेल्या काही महिन्यांपासून मुरबाड तहसील कार्यालयात न्याय मागण्यासाठी फेऱ्या मारत होते. बुधवारी शासकीय सुटी असली तरी पुरवठा विभागातील कामासाठी तहसीलदार कार्यालय उघडे होते. देसले हे सकाळी ११ च्या सुमारास कार्यालयात गेले व इमारतीच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली. वारंवार फे-या मारूनही कामकाज होत नसल्याने ते निराश झाले होते. या कामासाठी मुरबाडचे तहसीलदार सर्जेराव म्हस्के पाटील हे त्यांच्याकडून पैसे मागत असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. प्रत्येक कामासाठी तहसीलदार हे शेतक-यांकडून वारंवार पैशाची मागणी करीत असल्याचे संतप्त शेतक-यांनी सांगितले. या प्रकरणी मुरबाडचे तहसीलदार व नायब तहसीलदार व संबंधीत कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत देसले यांचे पार्थिव ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला. तब्बल ७ तासानंतर संध्याकाळी ६.३० वाजता नातेवाईकांनी पार्थिव ताब्यात घेतले. यावेळी विद्यमान आमदार आणि माजी आमदारांमध्ये चांगलीच जुंपल्याचे चित्रही बघायला मिळाले.



