ठाणे – जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी धडक कारवाई केली आहे. जिल्ह्यात २७ मे रोजी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत विविध ठिकाणी छापे टाकून तब्बल ७ लाख ३० हजार रुपयांहून अधिक किमतीचा भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचा अन्नसाठा जप्त करण्यात आला. याशिवाय प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री केल्याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे साडेचार लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एफडीएच्या पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध अन्न आस्थापनांवर छापेमारी केली. या कारवाईदरम्यान भेसळयुक्त आणि खराब दर्जाचे खाद्यपदार्थ, अयोग्य पद्धतीने साठवलेले साहित्य तसेच नियमांचे उल्लंघन करणारा मोठा अन्नसाठा आढळून आला. यामध्ये अधिकाऱ्यांनी १ लाख ४९ हजार ७२४ रुपयांचे खाद्यतेल, ९३ हजार ८३० रुपयांचे फरसाण, २ लाख ६ हजार ८०० रुपयांचे तूप, ८ हजार १९० रुपयांचे हक्का नुडल्स, १७ हजार १०० रुपयांची ताडी, ५४ हजार ९६ रुपयांचे शरबत आणि १ लाख ९७ हजार ६४० रुपये किमतीचा डिंक (गम अरेबिक) असा एकूण लाखो रुपयांचा साठा जप्त केला.

दरम्यान, प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री आणि साठा केल्याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींविरोधात गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. या कारवाईत ४ लाख ५३ हजार ३४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संबंधितांविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

अन्न व औषध प्रशासनाने सर्व अन्न व्यावसायिकांना अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसून, भेसळयुक्त किंवा निकृष्ट अन्नपदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात यापुढेही अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांना अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत किंवा भेसळीबाबत तक्रार असल्यास त्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा किंवा वागळे इस्टेट येथील सह आयुक्त कार्यालयात तक्रार नोंदवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.