ठाणे : खत खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांवर वारंवार फेऱ्या मारण्याची शेतकऱ्यांची अडचण आता कमी होणार आहे. केंद्र शासनाच्या ‘फ्रेमवर्क फॉर फर्टीलायझर सेल’ (एफएफएस) या डिजिटल प्रणालीद्वारे ठाणे जिल्ह्यात २७ ऑगस्टपासून खत विक्री सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना मोबाइलवरून घरबसल्या आवश्यक खताची नोंदणी करता येईल. त्यानंतर मिळणारा क्यूआर कोड निवडलेल्या कृषी सेवा केंद्रावर दाखवून खत खरेदी करता येईल.

खत विक्री व वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासह शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार खत उपलब्ध करून देणे, हा या डिजिटल प्रणालीचा मुख्य उद्देश आहे. ठाणे जिल्ह्यासह राज्यातील सात जिल्ह्यांत २७ ऑगस्टपासून या प्रणालीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. एफएफएस ॲपद्वारे शेतकऱ्यांना आपल्या मोबाइलवरून खताची नोंदणी करता येईल.

यासाठी प्रथम ‘फ्रेमवर्क फॉर फर्टीलायझर सेल’ ॲप डाउनलोड करून ऍग्रीस्टॅक आयडी वा आधार क्रमांकाच्या माध्यमातून नोंदणी करावी लागणार आहे. ऍग्रीस्टॅक आयडीद्वारे लॉगिन केल्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या जमिनीची माहिती प्रणालीमध्ये उपलब्ध होणार आहे. आधार क्रमांकाद्वारे नोंदणी केल्यास जमिनीची आवश्यक माहिती शेतकऱ्याला स्वतः भरावी लागणार आहे.

जमिनीची व पिकांची माहिती तपासून ती सत्यापित केल्यानंतर शेतकऱ्याला आपल्या गरजेनुसार खताची निवड करून अर्ज करता येणार आहे. प्रणालीत उपलब्ध असलेल्या निविष्ठा विक्रेत्यांची यादीही पाहता येणार असून, त्यापैकी आपल्या सोयीचा व संबंधित खत उपलब्ध असलेला विक्रेता निवडता येईल. अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याला क्यूआर कोड मिळणार आहे. हा क्यूआर कोड निवडलेल्या कृषी सेवा केंद्रावर दाखविल्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून खत खरेदी करता येणार आहे. मात्र या क्यूआर कोडची मुदत तीन दिवसांची असणार आहे. या कालावधीत खत खरेदी न केल्यास पुन्हा अर्ज करून नवीन क्यूआर कोड घ्यावा लागणार आहे.

नवीन प्रणालीची अंमलबजावणी सुरळीत व्हावी यासाठी कृषी विभागाकडून निविष्ठा विक्रेते तसेच क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ग्रामसभा आणि इतर ग्रामस्तरीय कार्यक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्येही या प्रणालीबाबत जनजागृती करण्यात आली आहे.

जिल्हास्तरीय मदत कक्ष कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष खत विक्री केंद्रांवर उपस्थित राहून शेतकऱ्यांना एफएफएस ॲपच्या वापराबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी टोकावडे येथील विशे ॲग्रो सेंटर येथे, तर कृषी विकास अधिकारी मुनिर बाचोटीकर यांनी बरडपाडा येथील पोगेरे ॲग्रो सेंटर येथे उपस्थित राहून शेतकऱ्यांना बुकिंग प्रक्रिया समजावून सांगितली. यावेळी शेतकऱ्यांचे क्यूआर कोड तयार करून घेण्यात आले. शेतकऱ्यांना नवीन डिजिटल प्रणाली वापरताना अडचणी येऊ नयेत यासाठी तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय मदत कक्षही सुरू करण्यात आले आहेत. क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी आणि निविष्ठा विक्रेत्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याने शेतकऱ्यांना प्रत्यक्ष स्तरावरही आवश्यक मार्गदर्शन मिळणार आहे.

खताची उपलब्धता, नोंदणी, विक्रेत्याची निवड व प्रत्यक्ष वितरण या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्याबरोबरच खत वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक करण्यासाठी ही प्रणाली महत्त्वाची ठरणार आहे.