ठाणे : ठाणे जिल्ह्यात मंगळवारी अग्नीतांडव पहायला मिळाला. घोडबंदर येथील मानपाडा भागात मंगळवारी रात्री चार गाळ्यांना भीषण आग लागली. तर भिवंडी तेल गोदामाला आग लागून टाक्यांचा स्फोट झाला. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.
यातील पहिली घटना भिवंडीतील खाडीपार येथील मूलचंद कंपाऊंड भागात उघडकीस आली. मूलचंद कंपाऊंड येथे तेल गोदाम आहे. या गोदामात तेलाचा साठा होता. तसेच रसाययनांच्या टाक्या होत्या. सकाळपासून येथील गोदामातून टाक्यांच्या स्फोटाचे आवाज होत होते. अवघ्या काही मिनीटांत धूराचे लोट हवेत पसरले. आगीचे लोट देखील पसरत असल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. भिवंडी अग्नीशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. परंतु गोदाम पूर्णत: जळाले होते.
दुसरी घटना ठाण्यातील घोडबंदर भागात उघडकीस आली. घोडबंदर येथील मानपाडा परिसरात मंगळवारी रात्री ७.४९ वाजताच्या सुमारास चार गाळ्यांना अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाणे महापालिकेचे अग्नीशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग यंत्रणांसह घटनास्थळी पोहचले. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सुमारे तीन तास लागले.
रात्री ११.१० वाजता प्रशानाने येथील आगीवर नियंत्रण मिळविले. घटनास्थळी नागरिकांची देखील गर्दी झाली होती. या दोन्ही घटनेत कोणतीही जीवितहान झाली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली. परंतु या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.
