बदलापूरः शहरांच्या वेशीवर असलेल्या आणि नागरीकरणाच्या चक्रात अडकलेल्या ग्रामपंचायतींच्या समस्या आता काही लपून राहिलेल्या नाहीत. त्या समस्यांवर तेथील बालकेही प्रभावीपणे बोलू शकतात. इतकेच नाही तर हेच बालक त्यावर उपायही सांगू शकतात. अशीच एक ग्रामसभा चक्क शालेय विद्यार्थांनी चालवली. यात विद्यार्थ्यांनी स्पष्टपणे आपली मते मांडली आणि त्यावर त्यांच्यातीलच सरपंच, उपसरपंचांनी प्रभावीपणे उत्तरे देत चर्चा घडवून आणली. ठाणे जिल्ह्यातील पहिली बाल ग्रामसभा वांगणीत संपन्न झाली. यात विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय होता.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, ग्रामस्वच्छता सोहळा आणि सांस्कृतिक उपक्रम या कार्यक्रमाचे नुकतेच वांगणीत आयोजन करण्यात आले होते. झपाट्याने नागरीकरण होत असलेल्या वांगणी येथे ठाणे जिल्ह्यातील पहिली बाल ग्रामसभा उत्साहात पार पडली. ज्ञानेश्वर मंगल कार्यालयात आयोजित या विशेष ग्रामसभेत शालेय विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेत गावातील विविध प्रश्नांवर स्पष्टपणे आपली मते मांडली. अनधिकृत बांधकामे, पाणीटंचाई, प्रदूषण, कचरा व्यवस्थापन यांसह वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींकडे विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले. शहराचा विस्तार झपाट्याने होत असल्याने तातडीने नगरपंचायत प्रशासन लागू करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

या बाल ग्रामसभेचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांमधूनच सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांची निवड करण्यात आली होती. या बाल लोकप्रतिनिधींनी सभेचे कामकाज सांभाळले. शिक्षण, आरोग्य सेवा, स्वच्छता, पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधांबाबत विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांना विद्यार्थी महिला सरपंच व उपसरपंचांनी उत्तरे देत चर्चा पुढे नेली. या उपक्रमाला आमदार किसन कथोरे, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेश पाटील, शिवसेना प्रदेश सचिव एकनाथ शेलार, सामाजिक कार्यकर्ते शंकर शेलार, सरपंच वनिता आढाव, सदस्य अभिजीत शेलार, योगेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या जागरूकतेचे कौतुक करत अशा उपक्रमांतून नागरिकत्वाची जाणीव लहान वयातच रुजते, असे मत व्यक्त केले.

दरम्यान, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत वांगणी ग्रामपंचायतीतर्फे महिनाभर ग्रामस्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अभियानात वांगणी व परिसरातील आठ ते दहा शाळांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रभागातून प्रभातफेरी काढून तसेच पथनाट्यांच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आणि नागरिकांमध्ये जनजागृती केली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते वांगणी ग्रामपंचायतीच्या घंटागाड्यांचे लोकार्पण करण्यात आले. नव्या घंटागाड्यांमुळे कचरा संकलन अधिक प्रभावी होऊन शहर स्वच्छतेला चालना मिळेल, असा विश्वास ग्रामपंचायत सदस्यांनी व्यक्त केला.