ठाणे : एखाद्या निरोगी मुलाच्या शरीरातून रोज बाहेर पडणारी विष्ठा (स्टूल) दुसऱ्या गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णासाठी उपचाराचा भाग ठरू शकते. ठाण्यात राज्यातील पहिले ‘फेकल मायक्रोबायोटा ट्रान्सप्लांट’ (FMT) थेरपी केंद्र सुरू करण्यात आले आहे. यासाठी ३ ते १२ वर्षे वयोगटातील निरोगी मुलांना विष्ठा (स्टूल) दाता म्हणून सहभागी करून घेण्यात येणार आहे. तपासणीत पात्र ठरणाऱ्या दात्यांना दरमहा २० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.

‘रिस्प्लाइस ऑटिझम रिसर्च फाउंडेशन’चा भाग असलेल्या ‘रिस्प्लाइस रिसर्च इनिशिएटिव्ह’कडून ठाण्यात हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या प्रक्रियेमध्ये निरोगी दात्याच्या विष्ठेत असलेले सूक्ष्मजीव रुग्णाच्या आतड्यांमध्ये पोहोचविले जातात. आजार, संसर्ग किंवा प्रतिजैविकांच्या वापरामुळे आतड्यांतील सूक्ष्मजीवांचा समतोल बिघडलेल्या रुग्णांमध्ये हा समतोल पूर्ववत करण्याच्या उद्देशाने ही पद्धत वापरली जाते. या उपक्रमासाठी ३ ते १२ वर्षे वयोगटातील निरोगी मुले पात्र ठरू शकतात. मुलाला कोणताही जुनाट आजार नसणे, मागील तीन महिन्यांत अँटीबायोटिक्स किंवा प्रोबायोटिक्स न घेतलेले असणे आणि सर्व नियमित लसीकरण पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. तसेच नियमितपणे विष्ठा दान करण्याची तयारी असणे आवश्यक आहे. मात्र, केवळ वय आणि आरोग्याच्या निकषांवर दाता निश्चित केला जाणार नाही. रोगांचा प्रसार रोखण्यासाठी आणि प्रक्रियेची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी संभाव्य दात्यांची वैद्यकीय, शारीरिक आणि प्रयोगशाळेतील सखोल तपासणी केली जाणार आहे. या तपासणीत पात्र ठरल्यानंतरच मुलाची ‘विष्ठा दाता’ म्हणून निवड केली जाईल.

आतड्यांतील सूक्ष्मजीवांचा समतोल महत्त्वाचा

रेस्प्लाइस ऑटिझम रिसर्च फाउंडेशन अँड इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर थोडुपुनुरी यांच्या मते, अँटीबायोटिक्स, संसर्ग किंवा दीर्घकालीन आजारांमुळे पचनसंस्था आणि रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित उपयुक्त जीवाणूंचा समतोल बिघडू शकतो. निरोगी दात्याच्या विष्ठेच्या माध्यमातून विविध उपयुक्त सूक्ष्मजीव रुग्णाच्या आतड्यांमध्ये पोहोचविण्याचा प्रयत्न FMTमध्ये केला जातो. योग्य वैद्यकीय देखरेखीखाली आतड्यांतील सूक्ष्मजीवांची विविधता पुनर्स्थापित झाल्यास पचनक्रिया, दाह आणि आतड्यांचे कार्य सुधारण्यास मदत होऊ शकते. संस्थेच्या संशोधनानुसार अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि इन्फ्लेमेटरी बाऊल डिसीजसह ऑटिझम, ग्लोबल डेव्हलपमेंटल डिले आणि एसएसपीई यांसारख्या स्थितींमध्येही FMTच्या संभाव्य वापराचा अभ्यास करण्यात आला आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क

पात्र ठरलेल्या विष्ठा दात्यांना दरमहा २० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. त्यामुळे निरोगी मुलाची नियमितपणे तयार होणारी विष्ठा वैद्यकीय उपचारासाठी देण्याबरोबरच कुटुंबाला आर्थिक मोबदलाही मिळणार आहे. दाता म्हणून नोंदणी किंवा प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी ९८२१५२९६५३ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.