बदलापूर : महसूल मंत्र्यांनी वनहक्क धारकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत नुकतेच एक अभियान जाहीर केले आहे. मात्र, ठाणे जिल्ह्यात अद्यापही ६४ टक्के वनहक्क दावे प्रलंबित किंवा नामंजूर असून, या नव्या अभियानाच्या माध्यमातून हे सर्व विषय तत्काळ निकाली काढावेत, अशी मागणी श्रमिक मुक्ती संघटनेने केली आहे. संघटनेच्या वतीने ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय वनहक्क समितीचे अध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले.

देशातील आदिवासी आणि परंपरागत वननिवासींना वन संसाधनांवरील उपजीविकेचे आणि रहिवासाचे अधिकार देण्यासाठी २००६ मध्ये वनहक्क कायदा पारित करण्यात आला. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे गेल्या वीस वर्षांत निम्म्या दावेदारांनाही त्यांचे पूर्ण हक्क मिळालेले नाहीत. ठाणे जिल्ह्यात दाखल झालेल्या दाव्यांपैकी केवळ ३६ टक्के दावेच मान्य झाले असून, उर्वरित ६४ टक्के दावे अमान्य किंवा प्रलंबित आहेत, अशी माहिती श्रमिक मुक्ती संघटनेने आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आकडेवारीवरून दिली आहे. मान्य झालेल्या दाव्यांचे सरासरी क्षेत्र केवळ अर्धा हेक्टर इतकेच आहे. तसेच, अन्य परंपरागत वननिवासींचे तब्बल ९१ टक्के दावे नामंजूर करण्यात आले आहेत. सामूहिक वनहक्क बहुतांश गावांना मंजूर झाले असले तरी, त्यांच्या कायदेशीर अधिकारांचा सन्मान केला जात नसल्याची खंत संघटनेने व्यक्त केली आहे.

आदिवासी समूहांचा समूळ नायनाट केल्याचा आरोप

एका बाजूला हक्कांसाठी आदिवासींना वारंवार मोर्चे, आंदोलने आणि मंत्रालयावर धडका द्याव्या लागत आहेत. तर दुसऱ्या बाजूला महामार्ग, धरणे, विद्युत प्रकल्प आणि खाणींसाठी वनजमिनींचे मोठ्या प्रमाणावर हस्तांतरण सुरू आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये विनाशकारी अणुऊर्जेसह मोठे उदंचन विद्युत प्रकल्प, धरणे आणि नदीजोड प्रकल्प आणून उद्योजकांच्या फायद्यासाठी निसर्गाचा आणि त्यावर अवलंबून असलेल्या आदिवासी समूहांचा समूळ नायनाट केला जात असल्याचा गंभीर आरोप संघटनेने या पत्रातून केला आहे.

२००८ पासून दावे दाखल केलेल्या अनेक वननिवासींचा गेल्या वीस वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेत न्याय न मिळताच मृत्यू झाला आहे. आता शासनाने किमान या मृत दावेदारांच्या वारसांना तरी लवकरात लवकर हक्क द्यावेत, अशी मुख्य मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

…तर आदिवासींना जगण्याचे प्रत्यक्ष अधिकार मिळतील

नवीन अभियानाच्या पार्श्वभूमीवर, श्रमिक मुक्ती संघटनेने कल्याण, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर तालुक्यांत दाखल केलेल्या आणि सध्या प्रलंबित असलेल्या दाव्यांच्या व अपिलांच्या अद्ययावत याद्या जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केल्या आहेत. शासनाने प्रामाणिकपणे हे अभियान राबवल्यास आदिवासींना जगण्याचे अधिकार प्रत्यक्षात मिळतील, अशी आशा संघटनेच्या इंदवी तुळपुळे यांनी व्यक्त केली आहे.