ठाणे : शेअर बाजार आणि फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून दरमहा पाच ते सहा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून ठाण्यातील गुंतवणूकदारांची तब्बल १ कोटी २० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात धमनु कांबळे याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

कांबळे हा ‘युनिक वे सोल्युशन’ आणि ‘युनिक ट्रेड सोल्युशन’ या नावाने कार्यालय चालवत होता. या फर्ममध्ये गुंतवणूक केल्यास ११ ते १२ महिन्यांसाठी दरमहा पाच ते सहा टक्के परतावा देण्याचे आमिष गुंतवणूकदारांना दाखवण्यात आले होते. तक्रारदाराने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्याच्या मित्राच्या माध्यमातून कांबळे याच्या फर्मची माहिती त्यांना मिळाली.

कांबळे याचा भाऊ गुंतवणूकदारांकडून रक्कम स्वीकारत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. सुरुवातीला गुंतवणूकदारांना परतावा मिळत असल्याने तक्रारदाराचा या योजनेवरील विश्वास वाढला. त्यानंतर सप्टेंबर २०२२ ते जानेवारी २०२४ या कालावधीत तक्रारदाराने टप्प्याटप्प्याने एकूण १८ लाख रुपये गुंतवले. गुंतवणुकीपोटी तक्रारदार आणि त्याच्या सासऱ्यांना मिळून सुमारे ७ लाख २० हजार रुपये परतावा मिळाला. मात्र, १२ मार्च २०२४ नंतर परतावा देणे बंद झाले.

याबाबत त्यांनी कांबळे याला विचारणा केली असता, केल्यानंतर फॉरेक्स ट्रेडिंग करणाऱ्या कंपनीवर कारवाई झाल्याने खाती गोठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. लवकरच समस्या सुटून पैसे परत देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून पैसे परत करण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत आहे.

दरम्यान, कांबळे याने गुंतवणूकदारांना पैसे परत करण्याबाबत मुद्रांकपत्रावर लेखी करारही केला होता. जून २०२५ पर्यंत गुंतवलेली रक्कम परत करण्याचे त्यात नमूद होते. मात्र, करार करूनही पैसे परत न केल्याने गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. या प्रकरणात इतर नऊ गुंतवणूकदारही पुढे आले. याप्रकरणी एकूण १ कोटी २० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.