Thane History: मुंबई उपनगरालगत वसलेले ठाणे शहर आज आधुनिकतेकडे वेगाने झेपावत आहे. असे असले तरी, या शहराचा दडलेला इतिहास तितकाच समृद्ध आणि रोचक करणारा आहे. कधी काळी धोरणात्मक दृष्ट्या महत्त्वाचा असलेला ‘ठाणे किल्ला’ आज ठाणे जेलच्या रूपात उभा आहे, हीच बाब या शहराच्या ऐतिहासिक रूपांतराची साक्ष देते. शिलाहार, पोर्तुगीज आणि मराठा काळात उभारण्यात आलेल्या गड-किल्ल्यांनी ठाण्याच्या दुर्गवैभवाला वेगळी ओळख दिली आहे. या किल्ल्यांचा इतिहास नेमका काय आहे, आणि काळाच्या ओघात त्यांचे रूप कसे बदलत गेले, याचा एक रंजक प्रवास…

ठाणे शहराला जशी तलावाची संपत्ती लाभली तसेच गड-किल्ल्यांचा इतिहास लाभला आहे. हे गड – किल्ले मराठ्यांच्या पराक्रमाचे, क्रांतिकारकांच्या बलिदानाचे आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे मूर्तिमंत प्रतीक बनून ठाणेकरांची मान अभिमानाने उंचावते आहे. ठाणे महापालिका हद्दीत ठाणे किल्ला, हिराकोट, पारसिक किल्ला, नागलाकोट, गायमुखची गढी, घोडबंदर हे किल्ले येतात. यापैकी ठाण्याचा भुईकोट व घोडबंदरचा किल्ला महत्त्वाचे आहेत. ठाण्यातील हे सर्व किल्ले पोर्तुगीजांनी बांधले होते.

पण रणधुरंधर चिमाजी अप्पाच्या नेतृत्वाखालील सरदार, अंजूरचे गंगाजी नाईक, व त्यांचे चार बंधू, खंडोजी माणकर, बिवलकर, आदी सरदार व मराठी सैन्याने भीम-पराक्रम गाजवून हे किल्ले जिंकून घेऊन पोर्तुगीजांची दोनशे वर्षांची राजवट संपुष्टात आणली, असे इतिहास अभ्यासक सदाशिव टेटविलकर सांगतात.

यातील काही गड-किल्ल्यांचा इतिहास जाणून घेऊया…

ठाणे किल्ला

ठाणे किल्ला म्हणजे आजचे ठाणे कारागृह हा किल्ला रणधुरंधर चिमाजी अप्पांच्या वसई माहिमेत विजयाची नांदी ठरणारा आहे. ठाण्याचा हा किल्ला पोर्तूगीजांनी बांधला परंतू, इग्रजांनी या किल्ल्याचे रुपांतर कारागृहात केले. इ.स. १८६ साली ठाणे किल्ल्यातील पहिला राजबंदी म्हणून त्र्यंबकजी डेंगळे यांची नोंद आढळते. त्यानंतर क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्र्यवीर सावरकर, साने गुरुजी, तसेच ठाण्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ताजी ताम्हणे यांनाही येथे कैद करण्यात आले होते.

नाशिकचे कलेक्टर जॅक्सनचा वध करणारे तरुण क्रांतिकारक अनंत लक्ष्मण कान्हेरे, कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे यांनीही येथे कारावास भोगला. याशिवाय नानासाहेब दामले, माधवराव काळदाते, लखूनाना पुरोहित, यशवंत ठाणेकर तसेच पारसिक बोगदा बॉम्ब खटल्यातील मारुती कुमार, रमेश चिटणीस आणि मोरेश्वर नाचणे हेही या किल्ल्यात बंदिवान होते.

विशेष म्हणजे स्वातंत्र्यलढ्यात महिलांचाही सक्रिय सहभाग होता. यशोदाबाई कोतवाल, यमुताई साने, सिंधु ताम्हाणे, कुमुद गुप्ते, कावेरीताई पाटील आणि ताराबाई रणदिवे यांसारख्या अनेक महिलांनीही ठाणे किल्ल्यात कारावास भोगला.

घोडबंदरचा किल्ला

पोर्तुगीजांनी इ. स. १५३५च्या सुमारास घोडबंदरचा किल्ला बांधला. हा किल्ला संरक्षणदृष्ट्या अति महत्त्वाचा आहे. किल्ल्यावरून भाईंदर, वसई, धारावी, उत्तन व कामणदुर्ग या विस्तीर्ण शहरांचे दर्शन घडते.

किल्ल्याची बांधणी युरोपियन पद्धतीची असून त्यात प्रशस्त सभागृह, कचेऱ्या, दारुगोळ्याचे कोठार, व उंच टेहळणी बुरुज आहे. इ.स. १६७२ साली शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर स्वारी केली होती. पुढे एप्रिल १७३७ मध्ये मराठ्यांनी हा किल्ला स्वराज्यात दाखल केला. इ.स. १७७४ मध्ये इंग्रजांनी पुन्हा घोडबंदर किल्ला मराठ्याकडून जिंकून घेतला, तो भारत स्वतंत्र होईपर्यंत त्यांच्याच ताब्यात होता.

हिराकोट

मराठ्यांचे साष्टीचे सुभेदार रामजी बिवलकर यांनी हिराकोट १७३७ साली बांधला. हा ठाणे रेल्वे स्टेशन पासून अवघ्या ५-६ मिनिटांच्या अंतरावर असून सध्या त्यात मामलेदार कचेरी, टाउन पोलिस जुनी नगरपालिका, सरकारी दफ्तरखाना व इतर कचेऱ्या आहेत. ही ऐतिहासिक वास्तू सुभेदार बिवलकरांनी आपल्या प्रशासकीय कामकाजासाठी बनविली होती. इंग्रजांनी याचा वापर काही काळ तुरुंग म्हणून केला. महागिरी व चेंदणी बंदरात येणाऱ्या जहाजांवर नजर ठेवण्याचे काम हिराकोट चोख बजावीत असे.

पारसिक किल्ला

पारसिक किल्ला हा ठाणे परिसरातील एक ऐतिहासिक किल्ला मानला जातो.पोर्तुगीज साम्राज्य यांनी या किल्ल्याची उभारणी सुमारे १६व्या शतकात केली.पारसिक टेकडीवरील उंच ठिकाणी असलेल्या या किल्ल्यामुळे ठाणे आणि नवी मुंबई अशा आसपासच्या शहरांवर सहज नजर ठेवता येत असे, त्यामुळे त्याला लष्करीदृष्ट्या मोठे महत्त्व होते. नंतर हा किल्ला मराठा साम्राज्य यांच्या ताब्यात गेला.

मराठ्यांनी या किल्ल्याचा वापर पहारा ठेवण्यासाठी आणि शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी केला.नंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी च्या काळात या किल्ल्याचे महत्त्व कमी होत गेले आणि तो हळूहळू दुर्लक्षित झाला. आज या किल्ल्याचे बहुतांश भाग अवशेषांच्या स्वरूपात उरले असले तरी तो इतिहासप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी एक आकर्षक ठिकाण मानला जातो.

नागलाकोट किल्ला

नागलाकोट किल्ला हा ठाणे शहरातील एक प्राचीन आणि ऐतिहासिक किल्ला होता . आज हा किल्ला पूर्णपणे अस्तित्वात नसला तरी त्याचे अवशेष आणि ऐतिहासिक उल्लेख ठाण्याच्या समृद्ध भूतकाळाची साक्ष देतात. नागलाकोट किल्ला मुख्यतः प्राचीन काळात, विशेषतः शिलाहार वंश यांच्या काळात अस्तित्वात होता, असे मानले जाते. त्या काळात ठाणे हे एक महत्त्वाचे व्यापारी आणि प्रशासकीय केंद्र होते, त्यामुळे अशा किल्ल्यांची उभारणी संरक्षणासाठी करण्यात आली होती.

ठाणे बोरिवली मार्गावरील नागला बंदर गावाजवळ असलेल्या छोट्या टेकडीवर हा किल्ला होता. नागलाकोट हा किल्ला ठाणे खाडी आणि आसपासच्या व्यापारमार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी उपयोगी होता. पुढे दिल्ली सल्तनत आणि नंतर पोर्तुगीज साम्राज्य यांच्या काळात या परिसरात अनेक बदल झाले, ज्यामुळे नागलाकोट किल्ल्याचे महत्त्व कमी होत गेले आणि कालांतराने तो नष्ट झाला. आज नागलाकोट किल्ल्याचे बांधकाम फारसे दिसत नाही, पण इतिहासात त्याचा उल्लेख ठाण्याच्या सुरुवातीच्या संरक्षण व्यवस्थेचा एक भाग म्हणून आढळतो.