ठाणे : ठाण्यातील गणेशोत्सव मंडळांना लवकरात लवकर मंडप उभारणीसाठी परवानगी मिळावी, यासाठी महापालिका प्रशासनाने ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज स्विकारण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. असे असले तरी, ठाणे महापालिकेकडे आतापर्यंत २८२ गणेश मंडळांनी केलेल्या अर्जांपैकी केवळ ८० मंडळांना मंडप उभारणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. तर, २०२ गणेश मंडळे अद्यापही मंडप परवानगी प्रतिक्षेत असल्याचे चित्र आहे.
गणेशोत्सवासाठी मंडप उभारण्यापूर्वी महापालिकेसह संबंधित यंत्रणांची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी यंदा ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात आले. महापालिकेच्या प्रभाग समितीनिहाय आकडेवारीनुसार १४५ अर्ज ऑनलाइन, तर १३७ अर्ज ऑफलाइन पद्धतीने प्राप्त झाले आहेत. मात्र, एकूण अर्जांच्या तुलनेत परवानगी मिळालेल्या मंडळांची संख्या अत्यल्प असल्याचे चित्र आहे. गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असताना ठाणे महापालिकेच्या मंडप परवानगी प्रक्रियेचा खोळंबा समोर आला आहे. तब्बल २०२ अर्ज अद्याप प्रलंबित असल्याने गणेश मंडळांमध्ये नाराजीचे वातावरण असून यातील अनेक मंडळांनी आता जुन्या परवानगीच्या आधारे दिलेल्या आकारानुसार मंडप उभारणी सुरू केल्याचे चित्र आहे. तर, काही मंडळांनी मंडपही उभारल्याचे चित्र आहे.
प्रभाग समितीनिहाय आकडेवारी
मंडप परवानगीत माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती सर्वाधिक पिछाडीवर असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. या विभागात एकूण ५५ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी केवळ ४ मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. तब्बल ५० अर्ज प्रलंबित आहेत. वर्तकनगरमध्ये ४२ अर्जांपैकी ८ मंडळांना परवानगी मिळाली असून ३४ अर्ज प्रलंबित आहेत. लोकमान्यनगर-सावरकरनगरमध्ये ३६ अर्ज दाखल झाले असून १३ मंडळांना परवानगी देण्यात आली आहे, तर २३ अर्ज प्रलंबित आहेत. कळवा येथे ३८ अर्जांपैकी १७ मंडळांना परवानगी मिळाली असून २१ अर्ज प्रलंबित आहेत. वागळे प्रभाग समितीत ३१ अर्जांपैकी १५ मंडळांना परवानगी देण्यात आली असून १६ अर्ज प्रलंबित आहेत. नौपाडा-कोपरी प्रभाग समितीत १८ अर्ज प्राप्त झाले असून ४ मंडळांना परवानगी मिळाली आहे. १४ अर्ज प्रलंबित आहेत. उथळसरमध्ये २३ अर्जांपैकी ७ मंडळांना परवानगी देण्यात आली असून १६ अर्ज प्रलंबित आहेत. मुंब्रा येथे ९ अर्जांपैकी केवळ ३ मंडळांना परवानगी देण्यात आली असून ६ अर्ज प्रलंबित आहेत. तर दिव्यात १७ अर्जांपैकी अवघ्या २ मंडळांना परवानगी मिळाली असून तब्बल १५ अर्ज प्रलंबित आहेत.
प्रतिक्रीया
ठाण्यातील गणेशोत्सव मंडळांना लवकरात लवकर मंडप उभारणीसाठी परवानगी मिळावी, यासाठी महापालिका प्रशासनाने ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज स्विकारण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. मात्र, पालिका तसेच इतर विभागांना ऑफलाईन सुविधेबाबत माहित नसल्याने परवानगी प्रकियेत अडथळे आले. ऑनलाईन प्रक्रीयेत इंटरनेटच्या तांत्रिक अडचणीमुळे अर्ज दाखल आणि परवानगीस विलंब होत आहे. काही मंडळांनीही उशीराने अर्ज दाखल केले आहेत. परवानगी मिळण्याची प्रक्रीया सुरू असली तरी, उत्सव लक्षात घेऊन काही मंडळांनी जुन्या मंडपाप्रमाणेच उभारणी सुरू केली आहे. – समीर सावंत, ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समिती
या संदर्भात पालिकेचे सहाय्यक आयुक्त सोपान भाईक यांच्याशी वारंवार संपर्क साधला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही. तसेच उपायुक्त जितेंद्र निकम यांच्याशी संपर्क साधला मात्र, त्यांच्याकडूनही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
