ठाणे – गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असताना ठाण्यातील मूर्तिकारांसमोर शाडू मातीच्या मूर्तींच्या विक्रीचे संकट उभे राहिले आहे. पीओपीच्या मूर्तींवरील बंदीबाबत स्पष्ट धोरण नसल्याने ग्राहकांचा कल पीओपीच्या मूर्तींकडे कायम आहे. परिणामी शाडू मातीच्या मूर्तींना अद्यापही मागणी नसल्याचे मूर्तिकरांचे म्हणणे आहे. दरम्यान शाडूच्या मूर्ती कारखान्यात पडून असल्याने लाखो रुपयांचे नुकसान होण्याची भीती मूर्तिकारांनी व्यक्त केली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेशमूर्तींना प्रोत्साहन देण्यासाठी शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, शाडू मातीच्या मूर्ती तयार करण्यासाठी लागणारा वेळ, वाढलेला उत्पादन खर्च, कारागिरांची कमतरता आणि ग्राहकांची बदलती पसंती यामुळे स्थानिक मूर्तिकारांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. दुसरीकडे, पीओपीच्या मूर्तींवरील बंदीबाबत स्पष्टता नसल्याने बाजारात पीओपीच्या मूर्तींची विक्री सुरूच आहे. त्यामुळे शाडू मातीच्या मूर्ती तयार करण्याचे प्रमाण किती ठेवायचे, याचा अंदाज मूर्तिकारांना बांधता येत नसून तयार केलेल्या मूर्ती शिल्लक राहण्याची समस्या निर्माण झाली आहे. महापालिकेकडून मोफत माती उपलब्ध करून दिली जात असली तरी ती मूर्ती घडविण्याच्या कालावधीशी सुसंगत वेळेत मिळत नसल्याची मूर्तिकारांची तक्रार आहे
ठाण्यातील मूर्तिकारांनी यंदा मागणीचा अंदाज घेत शाडू मातीच्या मूर्ती तयार केल्या. मात्र, अपेक्षेप्रमाणे नोंदणी न झाल्याने अनेक मूर्ती अद्याप विक्रीविना आहेत. मूर्तिकार कीर्ती ठाकूर यांनी यंदा ३५० शाडू मातीच्या आणि २५० पीओपीच्या मूर्ती तयार केल्या. पीओपीच्या सर्व मूर्तींची विक्री झाली असताना शाडू मातीच्या केवळ २० ते २२ मूर्ती नोंद झाल्या आहेत. या मूर्तींची विक्री न झाल्यास सुमारे साडेचार लाख रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. स्वतःची दोन लाख रुपयांची गुंतवणूकही अडकली असल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिकेकडून शाडू माती मोफत देण्याची योजना असली तरी ती प्रत्यक्ष मूर्ती घडविण्याच्या कालावधीशी जुळत नसल्याची तक्रार मूर्तिकारांनी केली आहे. मूर्ती तयार करण्याचे काम दिवाळीनंतरच सुरू केले जाते. मात्र महापालिकेकडून माती मे किंवा जूनमध्ये उपलब्ध होत असल्याने त्या वेळेपर्यंत अनेक मूर्ती तयार झालेल्या असतात. त्यामुळे मोफत मातीचा अपेक्षित फायदा होत नाही. ठाण्यातील एका संघटनेत सुमारे ५० मूर्तिकार आहेत. यंदा या मूर्तिकारांकडे सरासरी २५ ते ३० टक्के शाडू मातीच्या मूर्ती शिल्लक राहिल्या आहेत. मागणीचा अंदाज न आल्याने यंदा मोठे नुकसान होत असल्याचे मूर्तिकार संघटनेचे खजिनदार घनश्याम कुंभार यांनी सांगितले
पीओपीच्या मूर्तींना अधिक मागणी
पारंपरिक शाडू मातीच्या मूर्तींना जुनी पिढी पसंती देते; मात्र नव्या पिढीला विविध रूपे आणि सजावटीच्या मूर्ती अधिक आवडतात. शाडू मातीच्या मूर्तींमध्ये अशा प्रकारची सजावट करणे मर्यादित असल्याने पीओपीच्या मूर्तींची विक्री अधिक होते. सरकारकडून पीओपीबाबत ठाम निर्णय होत नसल्याने किती शाडूच्या मूर्ती तयार करायच्या, याचा अंदाज बांधणेही कठीण होत असल्याचे कल्याणचे मूर्तिकार सुनील गिरकर यांनी सांगितले.
अनधिकृत स्टॉलमुळेही नुकसान
ठाण्यात गणपतीच्या काळात अनधिकृत स्टॉल उभारून बाहेरून आणलेल्या मूर्तींची विक्री केली जाते. त्यामुळे स्थानिक मूर्तिकारांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. स्थानिक मूर्तिकारांकडून तयार केलेल्या मूर्तींची विक्री होत नसताना बाहेरील मूर्तींची विक्री वाढत असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
पीओपीबाबत सरकारचा ठाम निर्णय नसल्याने शाडूच्या मूर्ती किती तयार करायच्या, याचा अंदाज बांधता येत नाही. मोफत माती मे-जूनमध्ये देऊन उपयोग नाही. मूर्ती तयार करण्याचे काम त्याआधीच सुरू होते. त्यामुळे महापालिकेने जानेवारीपर्यंत माती उपलब्ध करून द्यावी. – घनश्याम कुंभार, खजिनदार, मूर्तिकार संघटना
ठाण्यातील मूर्तिकारांसाठी यंदा सुमारे १८ टन शाडू माती उपलब्ध करून देण्यात आली. यासाठी जाहिरात करण्यात आली होती. त्यानुसार १४ मूर्तिकारांनी अर्ज केला आणि त्यांना जूनच्या पहिल्या आठवड्यात माती वितरित करण्यात आली. – विद्या सावंत, प्रदुषण नियंत्रण विभाग, ठाणे महापालिका
