ठाणे : मुंबई उच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषण आणि वायूप्रदूषणासंदर्भात दिलेल्या आदेशांची गणेशमूर्ती विसर्जनावेळी अनेक भागांत पायमल्ली झाल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांकडून गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, डीजे मालक तसेच फटाके फोडणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. मागील तीन दिवसांत ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये ६९ गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणांमध्ये आता पोलिसांकडून पुढील कोणती कारवाई केली जाणार, याकडे लक्ष लागले आहे.

पुणेस्थित विद्यानंद बापट यांनी सण-उत्सवांच्या काळात होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाबाबत जनजागृती केल्यानंतर राज्यभरातील उत्सवांमध्ये होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा चर्चेत आला होता. उत्सवकाळातील ध्वनिप्रदूषणाची न्यायालयाने दखल घेत स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाने सण-उत्सवांच्या काळात रस्त्यांवर आणि मोकळ्या जागेत फटाके फोडण्यास बंदी, मिरवणुकांमध्ये लेझर प्रकाशझोत आणि ल्युमेन बीमचा वापर न करण्याचे निर्देश, तसेच परवानगी असलेल्या ध्वनिक्षेपकांची ध्वनीपातळी पोलिसांनी मोजण्याचे आदेश दिले होते.

या आदेशांची अंमलबजावणी अनंत चतुर्दशीच्या दिवशी करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले होते. अनंत चतुर्दशी अवघ्या दोन दिवसांवर असताना हे आदेश आल्याने अनेक गणेशोत्सव मंडळांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. शुक्रवारी विसर्जनाच्या दिवशी अनेक मोठ्या मंडळांनी ध्वनिक्षेपकांवर मोठ्या आवाजात गाणी वाजविली. तसेच ढोल-ताशे वाजविण्यात आले. विसर्जन घाट परिसर आणि मिरवणुकीच्या मार्गावर फटाकेही फोडण्यात आले. दरम्यान, या प्रकारांची दखल घेत पोलिसांनी संबंधित मंडळांचे पदाधिकारी, डीजे मालक तसेच इतरांविरोधात गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. २६ ते २८ सप्टेंबर या कालावधीत ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत म्हणजेच, ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात ६९ गुन्हे दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ध्वनिक्षमतेच्या (डेसिबल) मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेचे कलम २९३ आणि २२३ अंतर्गत ३६ गुन्हे दाखल आहेत. सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेचे कलम २८७ आणि २८८ अंतर्गत ३३ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली.

याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली असून संबंधित खटले न्यायालयासमोर मांडले जातील. – डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, सह पोलीस आयुक्त, ठाणे पोलीस चौकट मंडळांकडे अद्याप गुन्हे दाखल झाल्याची माहिती आलेली नाही. कायद्याच्या चौकटीत राहून उत्सव साजरे केले पाहिजेत. ढोल किंवा डीजेला आमचा विरोध नाही. मात्र, उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये, याची काळजी घेतली पाहिजे. कायद्याचे पालन करुनही गुन्हे दाखल झाले असतील तर आम्ही मंडळांना सहकार्य करू. – समीर सावंत, अध्यक्ष, ठाणे जिल्हा सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती.