ठाणे : गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवासाठी ठाणे महापालिकेकडे मंडप उभारणीच्या परवानगीसाठी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले असले, तरी प्रत्यक्ष परवानगी देण्याचा वेग अत्यंत संथ असल्याचे महापालिकेच्या आकडेवारीतून समोर आले आहे. ३१ ऑगस्टपर्यंत गणेशोत्सव मंडपासाठी तब्बल १७४ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी केवळ ९ मंडपांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे उत्सव तोंडावर आला असताना मंडप परवानग्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ठाणे महापालिकेने गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवासाठी ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यानुसार, मंडळानी अर्ज दाखल केले आहेत. पालिका प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार गणेशोत्सवासाठी १११ अर्ज ऑनलाइन, तर ६३ अर्ज ऑफलाइन, असे एकूण १७४ अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र प्रत्यक्षात केवळ ९ मंडपांना परवानगी देण्यात आली आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडप उभारणी, विद्युत व्यवस्था, ध्वनिक्षेपक, अग्निसुरक्षा तसेच वाहतूक व्यवस्थेसाठी संबंधित परवानग्या वेळेत मिळणे आवश्यक असते. त्यामुळे अर्ज दाखल करूनही परवानगीची प्रतीक्षा करणाऱ्या मंडळांसमोर नियोजनाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
वागळे, माजिवडा-मानपाड्यात सर्वाधिक अर्ज
गणेशोत्सवासाठी वागळे प्रभाग समितीत सर्वाधिक २६ अर्ज आले आहेत. त्यापैकी २३ ऑनलाइन आणि ३ ऑफलाइन अर्ज आहेत. मात्र केवळ २ मंडपांना परवानगी मिळाली आहे. माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीत ३३ अर्ज प्राप्त झाले असून एकाही मंडपाला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. त्यापाठोपाठ कळवा येथे २६ अर्ज, लोकमान्यनगर-सावरकरनगर येथे २४, दिवा येथे ११, नौपाडा येथे १२, उथळसर येथे १७, वर्तकनगर येथे १५ आणि मुंब्रा येथे ४ अर्ज आले आहेत.
एकाही मंडपाला परवानगी नाही
लोकमान्यनगर-सावरकरनगर आणि माजिवडा-मानपाडा येथे अनुक्रमे २४ आणि ३३ अर्ज असूनही एकही परवानगी देण्यात आलेली नाही. दिव्यात ११ अर्ज असून एकही परवानगी नाही. नौपाडा-कोपरी विभागातील १२ अर्जांपैकी एकाही मंडपाला परवानगी मिळालेली नसल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.
दहीहंडीला ५५ अर्ज, २८ मंडपांना परवानगी
दहीहंडी उत्सवासाठी मात्र गणेशोत्सवाच्या तुलनेत परवानगी देण्याची स्थिती काहीशी वेगळी आहे. ३१ ऑगस्टपर्यंत एकूण ५५ अर्ज महापालिकेकडे प्राप्त झाले असून त्यापैकी २८ मंडपांना परवानगी देण्यात आली आहे. दहीहंडीसाठी ५ अर्ज ऑनलाइन आणि ५० अर्ज ऑफलाइन पद्धतीने प्राप्त झाले आहेत. वागळे येथे १० अर्जांपैकी ६ मंडपांना, लोकमान्यनगर-सावरकरनगर येथे २ पैकी २, वर्तकनगर येथे ११ पैकी ५, माजिवडा-मानपाडा येथे १० पैकी ३ आणि उथळसर व कळवा येथे प्रत्येकी ४ आणि ६ अर्जांपैकी प्रत्येकी ३ मंडपांना परवानगी मिळाली आहे. मात्र मुंब्रा येथे एकही अर्ज आलेला नाही. दिव्यात २ अर्ज असूनही एकाही मंडपाला परवानगी देण्यात आलेली नाही.
