ठाणे – गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी डीजेचा वापर पूर्णपणे टाळावा आणि ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत. रुग्णालये, शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात ध्वनीप्रदूषण होणार नाही, याची विशेष काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी विविध शासकीय विभाग, पोलीस यंत्रणा, गणेश मंडळे आणि नागरिकांनी परस्पर समन्वय राखून उत्सव शांततेत पार पाडावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पांचाळ यांनी केले.
ध्वनिप्रदूषण नियंत्रणावर विशेष भर देताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबाबत आवश्यक सूचना सर्व गणेश मंडळांना आणि नागरिकांना द्याव्यात. तसेच संपूर्ण उत्सव काळात दररोज ध्वनिप्रदूषणाबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. यंदा १५, १८, १९ आणि २५ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास अतिरिक्त वेळेची मुभा देण्यात आली आहे. मात्र, इतर सर्व दिवशी रात्री १० वाजेपर्यंतच ध्वनिक्षेपक वापरण्याची मर्यादा लागू राहणार आहे.
गणेशोत्सवातील गर्दी आणि मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. गर्दीची ठिकाणे, महत्त्वाचे वाहतूक मार्ग आणि मिरवणूक मार्गांवर काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध ठेवण्यासोबतच पोलीस तपासणी अधिक प्रभावी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. वाहतूक नियमन आणि सुरक्षेसाठी होमगार्ड तसेच नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांची मदत घेण्याचेही सांगण्यात आले. रेल्वे स्थानक परिसरातील गणेश मंडळांनी वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, अशा पद्धतीने मंडप उभारावेत. मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची आवश्यक दुरुस्ती तातडीने करून घ्यावी, अशा सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.
गणेशोत्सवाच्या संपूर्ण कालावधीत वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणने विशेष खबरदारी घ्यावी. तसेच विसर्जनस्थळी भाविकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना चोख ठेवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागरिकांनी शाडूच्या मातीच्या मूर्तींना प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले. सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात किंवा गृहनिर्माण संस्थांच्या आवारातील उपलब्ध व्यवस्थेनुसार करावे, असेही सांगण्यात आले.
भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोक्याच्या ठिकाणी आवश्यक सुविधांनी युक्त तात्पुरती आरोग्य केंद्रे उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या. सामाजिक बांधीलकी जपत गणेश मंडळांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरे आयोजित करावीत आणि नागरिकांशी नियमित सुसंवाद साधावा, असे आवाहनही करण्यात आले.या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने यांच्यासह पोलीस, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग आणि विद्युत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
