ठाणे : ठाण्यात गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी आकारण्यात येणारे मंडप भाडे व अनामत रक्कम माफ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे. शासनाने यंदा अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याने हा निर्णय घेण्याची जबाबदारी आता सभेवर आली आहे. महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार हा प्रस्ताव सभेसमोर ठेवण्यात आला आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळांना मंडप भाडे आणि अनामत रक्कम माफ करावी, अशी मागणी नगरसेविका शितल ढमाले यांनी ९ ऑगस्ट रोजी आयुक्तांकडे केली होती. मागील वर्षी निर्णयाला उशीर झाल्यामुळे काही मंडळांकडून भाडे आणि अनामत रक्कम घेण्यात आली होती. त्यानंतर ती परत करण्याची वेळ महापालिकेवर आली होती. त्यामुळे यंदा उत्सवाच्या परवानगीची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली होती.

महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण आणि निष्कासन विभागाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार, सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारण्यासाठी भाडे आणि अनामत रकमेचे दर २०११ मधील सर्व साधारण सभा ठरावानुसार निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे ही रक्कम माफ करण्यासाठी स्वतंत्र धोरणात्मक निर्णय घेऊन सभेची मान्यता आवश्यक आहे.

२०२१ ते २०२४ या काळात शासनाच्या निर्देशांनुसार, तर २०२५ मध्ये महापालिकेच्या धोरणात्मक निर्णयानुसार गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांना मंडप भाडे व अनामत रक्कम माफ करण्यात आली होती. यंदा मात्र शासनाकडून अद्याप कोणतेही निर्देश आलेले नाहीत. त्यामुळे मागील वर्षाप्रमाणे सवलत द्यायची की नाही, याचा निर्णय सभेला घ्यावा लागणार आहे. दरम्यान, प्रस्तावाला आयुक्तांनी मान्यता दिली असून तो आता सभेच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे. सभेने मंजुरी दिल्यास ठाण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांना मंडप भाडे आणि अनामत रकमेपासून मोठा दिलासा मिळणार आहे.