ठाणे – सण-उत्सवांच्या नावाखाली होणारे ध्वनी आणि जलप्रदूषण, रस्त्यांवरील अतिक्रमण, वाहतूक कोंडीप्रकरणी मुंबई उच्च न्यायलयाने यापुर्वीच महत्वाचे निर्देश दिले आहेत. मात्र, या निर्देशानंतरही ठाणे शहरात नियमांची पायमल्ली सुरूच असल्याचे चित्र असून यंदाही रस्त्यांवरील मंडपच्या निमित्ताने ते दिसून येत आहे. याच मुद्द्यावरून याचिकाकर्त्यांसह ठाण्यातील पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी आता अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे. गणेशोत्सवानिमित्ताने डिजे आणि कर्णकर्कश ध्वनीक्षेपकांविरोधात पुण्यातील सजग नागरिक विद्यानंद बापट यांनी महापालिकेच्या बैठकीत तक्रार केली. यानंतर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असला तरी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने यापुर्वीच महत्वाचे निर्देश दिले आहेत.
ठाणेकर असलेले डाॅ. महेश बेडेकर यांनी ही याचिका दाखल केली होती आणि त्यासाठी दहा वर्षे लढा दिला होता. सण-उत्सवांच्या नावाखाली होणारे ध्वनी आणि जलप्रदूषण, रस्त्यांवरील अतिक्रमण, वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी मुंबई उच्च न्यायलयाने दिलेल्या निर्देशानुसार, पालिकेने सण-उत्सवांसाठी मार्गदर्शक नियमावली तयार केली आहे. यात मंडपचा आकार किती असावा यासह इतर महत्वाचे नियम आहेत. परंतु या नियमांचे पालन गेल्या काही वर्षांपासून होत नसून यंदाही हेच चित्र आहे. यावरूनच आता याचिकाकर्त्यांसह ठाण्यातील पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी आता अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
या संदर्भात ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे उपायुक्त जितेंद्र निकम यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. सण-उत्सवांचा आनंद प्रत्येकाला घेता यावा, मात्र या आनंदाच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांच्या जगण्याचा अधिकार हिरावून घेतला जाऊ नये, अशी भूमिका मांडत ‘सण-उत्सवांचा आनंद हवा, उन्माद नको’ असे याचिकाकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी सांगितले. सण-उत्सवांना आपला विरोध नसून सणांच्या नावाखाली वाढत चाललेल्या सार्वजनिक प्रदूषणाला, नियमांच्या उल्लंघनाला आणि सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाला विरोध असल्याचे बेडेकर यांनी स्पष्ट केले.
सणांच्या नावाखाली होणारे ध्वनी आणि जलप्रदूषण, रस्त्यांवरील अतिक्रमण, वाहतूक कोंडी आणि नियमांचे उल्लंघन याविरोधात २०१२ पासून आवाज उठवला असून, यासाठी तब्बल दहा वर्षे उच्च न्यायालयात लढा दिला. न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन व्हायला हवे, अशी भुमिकाही मांडत त्याचे पालन होत नसेल तर अवमान याचिका दाखल करण्याशिवाय पर्याय नाही, असेही त्यांनी स्पष्ट केली. पर्यावरणवादी कार्यकर्ते रोहित जोशी यांनी सांगितले, गणेशोत्सवाच्या काळात रस्ते अडवणारे बेकायदेशीर मंडप आणि कानठळ्या बसवणारे ध्वनी प्रदूषण यावर आळा घालण्यासाठी मी ठाणे पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे.
उच्च न्यायालयाच्या जनहित याचिका १७३/२०१० च्या आदेशांची पायमल्ली कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही. प्रशासनाने त्वरित पावले उचलून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, हीच आमची प्रमुख मागणी आहे. सणाचे पावित्र्य राखताना कायद्याचेही भान राहायला हवे. गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषण आणि रस्त्यांवरील अतिक्रमणाबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशांची ठाण्यात कठोर अंमलबजावणी व्हावी. अन्यथा अवमान याचिका दाखल करण्यात येईल. ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष समीर सावंत यांनीही उन्मादी उत्सवाबाबत समितीची भुमिका जाहिर केली आहे. ठाण्यात गणेशोत्सव मिरवणुकांमध्ये डिजेचा वापर फारसा होत नाही.
सण-उत्सवांबाबत जी नियमावली आहे, तीचे मंडळे पालन करतात. उत्सवात कोणी उन्माद करत असेल आणि त्यामुळे उत्सव बदनाम होत असेल तर अशा मंडळांवर कारवाई व्हायला हवी. काही मंडळाचे कार्यकर्ते मद्य प्रशासन करून गणेशोत्सव मिरवणुकीत सहभागी होता आणि विसर्जन घाटावर मुर्ती सोडून निघून जातात, अशा मंडळांची मान्यता रद्द केली पाहिजे, अशी भुमिका आमची आहे, असे त्यांनी सांगितले.
