ठाणे – संस्कार भारती यांच्यावतीने ठाण्यातील गावदेवी मैदानात ९० फूट महारांगोळी काढण्यात आली आहे. या रांगोळीतून ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांचा ऐतिहासिक प्रवास साकारण्यात आला आहे. तसेच मैदानात विविध प्रदर्शने मांडण्यात आलेली आहेत.
श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास या संस्थेच्यावतीने ठाण्यात स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात केले जाते. तसेच यात्रेच्या काही दिवस आधी सांस्कृतिक कार्यक्रम देखिल आयोजित केले जातात. यंदा मंगळवार, १७ मार्च रोजी गावदेवी मैदान येथे प्रदर्शन, महारांगोळी अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. संस्कार भारती कोकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने महारांगाेळी काढण्यात आली आहे. यावर्षी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेल्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताची १५० वर्ष पूर्तता या विषयावर आधारित ३५ कलाकारांनी महारांगोळी साकारली आहे.
गेल्या २५ वर्षांपासून ही परंपरा जपली जात आहे. यंदाची रांगोळी तब्बल ९० फूट बाय ९० फूट आकाराची आहे. यासाठी २५० किलो रांगोळी आणि ५०० किलो रंगाचा वापर करण्यात आला आहे. या महारांगोळीत भारत मातेची आकर्षक प्रतिमा, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे चित्र, ‘वंदे मातरम्’च्या ओळी तसेच भारतीय संस्कृतीतील स्वस्तिकासारखी शुभचिन्हे रेखाटण्यात आली आहेत. त्याचबरोबर भारताच्या संविधानाची ७५ वर्ष पूर्तता या विषयावर चित्र प्रदर्शन मांडण्यात आले आहे. यासोबतच मैदानात भारतीय संविधानातील कला आणि सुलेखन, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील १२ किल्ल्यांच्या प्रतिकृती, छंदोत्सव आणि फोटो सर्कलच्या गुढीपाडवा उत्सव अशा विविध विषयांवर प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनांचे उद्घाटन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते करण्यात आले. छंदोत्सव ग्रुुप मुंबई तर्फे विविध छंदवस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आले असून यामध्ये कागदापासून तयार केलेल्या वस्तू आहेत.
