Ganesh Visarjan 2025 : ठाणे : गणेशोत्सवाचा आजच दहावा दिवस आहे. तर, उद्या अनंत चतुर्दशी म्हणजेच अकराव्या दिवशी गणपतीचे विसर्जन होणार आहे. यंदाचा गणेशोत्सवही दरवर्षीप्रमाणे उत्साहात संपन्न झाला. दीड, पाच, सात दिवसाच्या गणेशमूर्तींचे विसर्जन देखील आनंदी वातावरणात पार पडले. आता, अकरा दिवसाच्या विसर्जनासाठी नागरिक सज्ज झाले आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सव मडळांकडून देखील गणपतीच्या विसर्जनाची जय्यत तयारी केली जात आहे. यंदा ठाणे जिल्ह्यात अनंत चतुर्दशीच्या दिवशी ४४ हजार ३२९ गणेश मूर्तींचे विसर्जन होणार आहे. यामध्ये ७९४ सार्वजनिक तर, ४३ हजार ५३५ घरगुती गणपतींचा समावेश आहे.

यंदाच्या वर्षी २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्दशी होती. यादिवशी गणपतीचे ढोलताशांच्या गजरात आगमन झाले. अनेकांनी गणपतीच्या स्वागताची मोठ्या उत्साहात तयारी केल्याचे दिसून आले होते. गणेशोत्सव प्रामुख्याने दहा दिवसांचा मानला जातो. मात्र, काही कुटुंबांत दीड, पाच, सात दिवसांच्या गणपतीची प्रथा आहे. त्यानुसार, दीड, पाच आणि सात दिवसाच्या गणपतीचे विसर्जन पार पडले. सातव्या दिवशी गणपतीसह गौरींचे देखील विसर्जन उत्साहात पार पडले. तर, आता अनंत चतुर्दशीसाठी नागरिक सज्ज झाले आहे.

उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी ठाणे जिल्ह्यात ४४ हजार ३२९ गणेश मूर्तींचे विसर्जन होणार आहे. यामध्ये ७९४ सार्वजनिक तर, ४३ हजार ५३५ घरगुती गणपतींचा समावेश आहे. मुंबईप्रमाणे ठाण्यात देखील काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा मोठमोठ्या उंचीच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली होती. त्यामुळे या गणेशमूर्तींची मिरवणूक देखील विशेष आकर्षण ठरणार आहेत.

यंदा ठाण्यात ध्वनिवर्धकांवरील दणदणाटी गाण्यांवरील गणेश विसर्जन मिरवणुका टाळून गणरायाला पारंपरिक टाळ-मृदंग आणि ढोलकी, भजन, कीर्तनाच्या गजरात निरोप देण्याचा निर्णय सार्वजनिक मंडळांनी घेतला आहे. त्याचबरोबर गुलालाची उधळण करण्याऐवजी फुलांची उधळण करीत पारंपारिक वेशभुषेत मिरवणुका काढल्या जाणार आहेत. तसेच मिरवणुकांमध्ये विविध सामाजिक संदेश देण्यात येणार आहेत.

अशी आहे विसर्जन व्यवस्था

ठाणे महापालिका क्षेत्रात यंदा कृत्रिम तलाव आणि फिरत्या विसर्जन व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी पेक्षा दीड पट जास्तीची विसर्जन व्यवस्था केली आहे. २३ कृत्रिम तलाव, ७७ टाकी विसर्जन व्यवस्था, १५ फिरती विसर्जन केंद्र, ९ खाडी घाट विसर्जन व्यवस्था आणि १० मूर्ती स्वीकृती केंद्र अशा एकूण १३४ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

परिमंडळानुसार गणेशमूर्ती विसर्जन आकडेवारी

परिमंडळसार्वजनिकघरगुती
ठाणे१०१४,४८२
भिवंडी १५० ३९८
कल्याण १७२ १४,३३०
उल्हासनगर २२२ १५,२२६
वागळे इस्टेट १४९ ५,५१७
एकूण ७९४ ४३,५३५