ठाणे : घोडबंदर येथील वाघबीळ भागात राज्यातील सर्वात मोठे आणि अत्याधुनिक नाट्यगृह उभारले जाणार असून ‘निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह’ या नावाने हे नाट्यगृह ओळखले जाणार आहे. २ हजार ५०० प्रेक्षक क्षमतेचे हे नाट्यगृह असणार आहे अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ठाणे शहरात मासुंदा तलाव परिसरात गडकरी रंगायतन आणि हिरानंदानी मेडोज भागात डाॅ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह आहे. या नाट्यगृहांची देखभाल दुरुस्ती ठाणे महापालिकेकडून केली जाते. ठाणेकर नाट्यप्रेमी नाटकांचे प्रयोग पाहण्यासाठी या दोन नाट्यगृहात जातात. आता ठाण्यात तिसरे आणि राज्यातील सर्वात मोठे नाट्यगृह घोडबंदर येथील वाघबीळ भागात होणार आहे. याबाबतची माहिती शुक्रवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
नाट्यगृहाची संकल्पना मांडण्यात आली असली तरी सुरुवातीला निधीअभावी काम रखडले होते. मात्र आता राज्य शासनाने एकूण १३८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, यासाठी दोन शासन निर्णय काढण्यात आले असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यात ८५ कोटी रुपये तर दुसऱ्या टप्प्यात ५३ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

येत्या तीन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले. निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह हे ठाण्याच्या सांस्कृतिक वैभवात मोठी भर घालणारे ठरणार असल्याचे सरनाईक म्हणाले.
असे असेल नाट्यगृह
‘निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह’ या नावाने हे नाट्यगृह ओळखले जाईल. सुमारे ७ हजार ३०० चौरस मीटर क्षेत्रफळावर उभारल्या जाणाऱ्या या नाट्यगृहात २ हजार ५०० आसन क्षमता असेल. त्यामध्ये मुख्य सभागृहात १ हजार ६०० आसने, तसेच दोन बाल्कनीत प्रत्येकी सुमारे ४५० आसनांची व्यवस्था असणार आहे. दिव्यांगांसाठी पहिल्या रांगेत १२ आसनांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. नाट्यगृहात उदवाहकांची व्यवस्था देखील असेल. नाट्यगृह परिसरातील सुमारे ६० टक्के जागा मोकळी ठेवून येथे प्लाझा उभारण्यात येणार आहे. या प्लाझामध्ये एकावेळी सुमारे दीड ते दोन हजार नागरिक उभे राहू शकतील. तसेच, परिसरात बगीचा देखील उभारला जाणार आहे.
