ठाणे : घोडबंदर येथील आझादनगर भागात शुक्रवारी दुपारी घराच्या सज्जाचा भाग शेजारच्या घरावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत १२ वर्षीय जयकुमार जयस्वाल याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्याची आई उर्मिला जयस्वाल (३५) आणि धाकटा भाऊ विनित जयस्वाल (९) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मानपाडा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर आझादनगर भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आझादनगर परिसरात दाट लोकवस्ती असून चर्चजवळील मद्रास चाळीत सुमारे २५ ते ३० वर्षे जुने एकमजली घर आहे. शुक्रवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास या घराच्या सज्जाचा भाग अचानक शेजारील जयस्वाल कुटुंबाच्या घरावर कोसळला. त्यावेळी उर्मिला जयस्वाल आणि त्यांची दोन्ही मुले घरात झोपलेली होती. सज्जा कोसळल्याने घराच्या छताचा काही भागही पडला आणि तिघेही ढिगाऱ्याखाली अडकले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी बचावकार्य सुरू केले. मात्र, जयकुमार याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

उर्मिला आणि विनित यांच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने मानपाडा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक, ठाणे महापालिकेचे उपायुक्त दिनेश तायडे, साहाय्यक आयुक्त सोनल काळे, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी वाय. एम. तडवी, कापूरबावडी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, तसेच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून चाळीतील तीन घरे रिकामी करण्यात आली असून परिसरात धोकापट्टी लावण्यात आली आहे.