ठाणे : घोडबंदर मुख्य तसेच सेवा रस्ते जोडणीच्या कामादरम्यान काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आला असला तरी, या मार्गावरील उड्डाण पुलांवर असलेला डांबरी रस्त्यावर पहिल्याच पावसात खड्डे पडले. याशिवाय, ठाणे शहरातून जाणाऱ्या नितीन कंपनी उड्डाण पुलावरही खड्डे पडले असून पाण्याने भरलेल्या या खड्ड्यात वाहने आदळत आहेत. तसेच पाऊस आणि खड्डयांमुळे वाहनांचा वेग मंदावून कोंडी होण्यास सुरूवात झाली असून यंदाही खड्ड्यांचा त्रास कायम असल्याचे आहे.
मुंबई महानगरातील वाहतूकीसाठी ठाणे आणि घोडबंदरचा रस्ता महत्वाचा मानला जातो. येथून दररोज शेकडो अवजड वाहनांची तसेच स्थानिक वाहनांची वाहतूक सुरू असते. ठाणे येथील आनंदनगर ते कापुरबावडी उड्डाणपुलापर्यंत डांबरी रस्ता आहे. तर, घोडबंदर मुख्य आणि सेवा रस्ता जोडणी कामात हा रस्ता काँक्रीटचा करण्यात आला आहे.
कापुरबावडी ते गायमुखदरम्यानचा रस्ता अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित केला आहे. या मार्गाची जबाबदारी ठाणे महापालिकेकडे आल्यानंतर पालिकेने पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची मोहीम हाती घेतली आहे. मुख्य आणि सेवा रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण होत असतानाच, आता उड्डाण पुलांवरील मास्टिकचे धोकादायक फुगवटे हटवून खड्डे भरण्याची कामे पालिकेने हाती घेतली होती. त्यामुळे घोडबंदर मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचा यंदा खड्डेमुक्त प्रवास होण्याची चिन्हे आहेत.
मात्र, पहिल्याच पावसात वाघबीळ, कापुरबावडी पुलावरील मुंबई दिशेने जाणारी मार्गीकेवर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे काँक्रीटच्या रस्त्याने वाहने सुसाट जात असली तरी, उड्डाण पुलावरही खड्ड्यामुळे वाहनांचा वेग मंदावून कोंडी होत आहे. उड्डाण पुलांच्या पायथ्याशी हे चित्र बुधवारी दिसून आले. त्याचबरोबर ठाणे शहरातून कॅडबरी ते नितीन कंपनी हा उड्डाण पुल जातो. या पुलावरही अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. याठिकाणीही वाहने खड्ड्यात आदळत असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे यंदा उड्डाण पुलांवरील मास्टिकचे धोकादायक फुगवटे हटवून खड्डे भरण्याची कामे पावसाळ्यापुर्वी केल्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळेल, अशी आशा होती. मात्र, पहिल्याच पावसात ती फोल ठरली आहे.
