ठाणे : घोडबंदर येथे मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरु आहे. येथील गायमुख मेट्रो स्थानकाचे वाऱ्यामुळे पत्रे उडत असल्याची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली. सुदैवाने हे पत्रे मेट्रो मार्गिकेखालील रस्त्यावर पडले नाहीत. अन्यथा मोठी दुर्घटना झाली असती.
ठाणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वडाळा-घाटकोपर-कासारवडवली (मेट्रो-४) आणि कासारवडवली ते गायमुख (मेट्रो ४ अ) या मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरु आहे. घोडबंदर भागात या मेट्रो मार्गिकेच्या काही स्थानकांच्या निर्मितीचे काम सुरु आहे. रविवारी वाऱ्यासह पाऊस सुरु असतानाच, निर्माणाधीन गायमुख मेट्रो स्थानकावर बसविण्यात आलेले छतावरील पत्रे उडाल्याची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली. यामध्ये छताचा एक पत्रा लोंबकळत असल्याचे दिसत होते.
या मेट्रो स्थानकाखालील मार्गावरून हजारो वाहने वाहतूक करत असतात. त्यामुळे हा पत्रा खालील मार्गिकेवर पडला असता तर मोठी दुर्घटना झाली असती. मेट्रो मार्गिका अद्याप सुरु झाली नसताना असे प्रकार घडू लागल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
