ठाणे : घोडबंदर मार्गावरील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या कासारवडवली उड्डाणपुलामध्ये दोष असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अधिकाऱ्यांकडून रविवारी उड्डाणपुलाची तपासणी करण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टीने या तपासणीदरम्यान उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. दुपारी सुमारे दोन वाजल्यापासून वाहतूक बंद असल्याने घोडबंदर मार्गावर कासारवडवली ते ब्रह्मांडदरम्यान मोठी कोंडी झाली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

कासारवडवली आणि आनंदनगर परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात गृहसंकुले उभी राहिली आहेत. त्यामुळे या भागातील वाहतुकीचा भार वाढला असून, दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यातच अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे कोंडीत आणखी भर पडते. ही समस्या कमी करण्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून सुमारे वर्षभरापूर्वी कासारवडवली येथे उड्डाणपूल उभारण्यात आला होता. दरम्यान, या उड्डाणपुलाच्या संरक्षण कठड्याजवळील काही भागामध्ये त्रुटी असल्याची तक्रार एमएमआरडीएला प्राप्त झाली.

या तक्रारीची दखल घेत एमएमआरडीएच्या पथकाने रविवारी दुपारी उड्डाणपुलाची पाहणी सुरू केली. तपासणीदरम्यान कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करण्याची सूचना वाहतूक पोलिसांना देण्यात आली. एमएमआरडीएच्या सूचनेनुसार दुपारी सुमारे दोन वाजता उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे उड्डाणपुलावरून जाणारी वाहने उड्डाणपूलाखालील मार्गाने वळवण्यात आली. त्याचा परिणाम घोडबंदर मार्गावरील वाहतुकीवर झाला. कासारवडवली ते ब्रह्मांडदरम्यान वाहनांच्या रांगा लागल्याने कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करण्याबाबत वाहतूक पोलिसांशी संपर्क साधला असता, एमएमआरडीएकडून मिळालेल्या सूचनेनुसार सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक बंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

नागरिकांकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर एमएमआरडीएच्या पथकाकडून उड्डाणपुलाची तपासणी करण्यात येत आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर उड्डाणपुलामध्ये प्रत्यक्षात काही त्रुटी आहे की नाही, हे स्पष्ट होईल. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे, अशी माहिती एमएमआरडीए विभागाकडून देण्यात आली.