ठाणे : घोडबंदर येथील कासारवडवली भागात ठाणे महापालिकेच्या एका इमारतीच्या उदवाहकामध्ये तीन मुले अडकल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी उघडकीस आला. तिन्ही मुलांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
कासारडवली गाव परिसरात महापालिकेची १२ मजली रेंटल इमारत आहे. या इमारतीच्या उदवाहकातून संस्कृत शिंगाडे (९), करण कागडा (१५) आणि रोहीत कागडा (१६) असे तिघेही जात होते. उदवाहक चौथ्या मजल्यावर आले असता, त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि तिघेही उदवाहकात अडकले. घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि उदवाहक दुरुस्त करणारे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी अवघ्या १० मिनीटांत तिन्ही मुलांना उदवाहकातून सुखरुप बाहेर काढले. त्यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचे ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
घराचे प्लास्टरचा भाग कोसळून तीन वर्षांच्या मुलीसह दोनजण जखमी झाल्याचा प्रकार रविवारी मध्यरात्री उघडकीस आला. आस्मा खान (३) आणि आसिफ खान (३२) अशी जखमींची नावे आहेत. मुंब्रा बाह्यवळण मार्गाजवळील देवरीपाडा परिसरात चाळ आहे. रविवारी मध्यरात्री आस्मा आणि आसिफ येथील एका घरामध्ये असताना त्यांच्या अंगावर घराच्या छताच्या प्लास्टरचा भाग आणि पंखा पडला. या घटनेत आसिफ यांच्या डोक्याला मार लागला. तर आस्मा हिच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. जखमींवर ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरु होते.
