ठाणे : घोडबंदर मार्गावरील मुख्य आणि सेवा रस्त्यांच्या जोडणीचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू असून हे काम ३१ डिसेंबर महिनाअखेरपर्यंत पुर्ण करण्याची मुदत ठेकेदाराला देण्यात आली होती. मात्र, या मुदतीत रस्त्याचे काम पुर्ण होणार नसल्यामुळे आता प्रकल्प कामाच्या पुर्णत्वास २६ फेब्रुवारी २०२६ अशी नवी मुदत देण्यात आली आहे. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी पालिकेत झालेल्या बैठकीत ही माहिती दिली असून यामुळे नव्या मुदतीपर्यंत रस्ते कामाचा जाच घोडबंदरवासियांना सोसावा लागणार असल्याचे चित्र आहे.

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी ठाणे महापालिका क्षेत्रातील घोडबंदर विभागातील विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी महापालिका आयुक्त सौरभ राव, पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मंत्री सरनाईक यांनी घोडबंदर मार्गावर होत असलेल्या वाहतूक कोंडीचा आढावा घेतला.

त्यावेळेस ठाणे वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीस कारणीभूत असलेल्या काही प्रमुख अडचणी स्पष्ट केल्या. घोडबंदर मानपाडा, कापुरबावडी, कासारवडवली ते भाईंदर पाडा, वाघबीळ तसेच इतर भागात रस्ते जोडणीची कामे सुरू असल्यामुळे मार्गिका अरुंद झाल्या असून यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. तसेच मानपाडा पुलाजवळ दोस्ती वसाहत येथून येत होती आणि ती थेट पुलावरून वाहतूक करायची. यामुळे वाहनांमुळे घोडबंदर मार्गावरून सुरू असलेल्या वाहतूकीला अडथळा होत होता. त्यामुळे दोस्ती वसाहत येथून पुलाजवळ येणारा मार्ग बंद केला आहे, असे शिरसाट म्हणाले.

घोडबंदर मार्गावरील मुख्य आणि सेवा रस्त्यांच्या जोडणीचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू असून हे काम ठरलेल्या मुदतीत म्हणजेच ३१ डिसेंबर महिनाअखेरपर्यंत पुर्ण करा असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले. मात्र, या मुदतीत रस्त्याचे काम पुर्ण होणे शक्य नसल्याचे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. मंत्री सरनाईक यांचा आग्रह असला तरी डिसेंबर अखेरपर्यंत रस्ते काम पुर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे आम्ही दिवा स्वप्न दाखविणार नाही. कारण, रस्ते जोडणी कामे पुर्ण झाली तरी काही किरकोळ कामे शिल्लक राहणार आहेत. ही कामे २६ फेब्रवारीपर्यंत पुर्ण होऊ शकतील, असा दावा आयुक्त राव यांनी केला. त्यामुळे घोडबंदर रस्ता पूर्णत्वाकडे वाटचाल करत असला, तरी नागरिकांना आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

असा आहे प्रकल्प

कापूरबावडी ते गायमुख या ९.३० किलोमीटर लांबीच्या घोडबंदर मार्गाचे पूर्ण काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. या प्रकल्पात मुख्य रस्ता आणि सेवा रस्ते दोन्हींचा समावेश असून, त्यासाठी तब्बल ५६० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मार्फत हे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पादरम्यान २ हजार १९६ वृक्ष बाधित झाले आहेत. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी हा प्रकल्प राबविला जात असला तरी अनेक नागरिकांनी त्यास विरोध दर्शविला आहे.

रस्ता ताब्यात घ्या

गायमुख ते फाउंटन पर्यंतचा रस्ता मीरा-भाईंदर महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला असून या महापालिकेने या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम ही केले आहे. अशाच प्रकारे गायमुख ते कापूरबावडी पर्यंतचा रस्ता ठाणे महापालिकेने आपल्याकडे घ्यावा आणि त्याचे काम करावे. अन्यथा गायमुख ते फाऊंटन पर्यंतचा रस्ता चांगला असल्यामुळे तिथून वाहने वेगाने येतील आणि पुढे गायमुख ते कापूरबावडी पर्यंत रस्ता चांगला नसल्यामुळे वाहतूक कोंडी होईल, असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधीच नसतो

घोडबंदर रस्त्यावरील खड्डे भरण्याची कामे ही आम्हीच करतो. ही कामे सार्वजनिक बांधकाम विभाग करत नाही आणि या कामासाठी त्यांच्याकडे कधीच निधी नसतो, असा दावा ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीत केला. तसेच गायमुख ते कापुरबावडी पर्यंतचा रस्ता ताब्यात घेण्याची तयारी दाखवत या रस्त्याचे काम आम्ही करू असे राव यांनी यावेळी स्पष्ट केले.