ठाणे : डबंदर घाटातील करपे कंपाऊंड परिसरात पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीच्या कामामुळे घोडबंदर मार्गावर सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारीही भीषण वाहतूक कोंडी झाली. वसईतील चिंचोटी नाक्यापासून ठाण्यातील कासारवडवली येथील आनंदनगरपर्यंत वाहतुकीची संथ गती कायम राहिल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. या कोंडीत अडकलेल्या नागरिकांना एक ते दोन तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. या भागातून प्रवास करणाऱ्यांकडून तीव्र संताप आणि चिंता व्यक्त केली जात होती. वाहतूक कोंडीत महिला, बालकांचे सर्वाधिक हाल झाले.
मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर घोडबंदर मार्गावरील करपे कंपाऊंड परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांची तात्पुरती दुरुस्ती करण्यात येत असली, तरी वारंवार खड्डे पडत असल्याने या मार्गाची अवस्था बिकट झाली आहे.
या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदर महापालिकेकडून खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र या कामामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून शनिवारीप्रमाणे रविवारीही मोठी वाहतूक कोंडी झाली. रविवारी सकाळपासूनच चिंचोटी नाक्यापासून घोडबंदर मार्गावर वाहनांची संख्या वाढू लागली. कासारवडवली, गायमुख, भाईंदरपाडा मार्गे आनंदनगरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अनेक ठिकाणी वाहने संथ असल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
काही वाहनचालकांना काही किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठीही तासभरापेक्षा अधिक वेळ लागला. घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीचा परिणाम ठाणे शहराच्या वेशीपर्यंत जाणवू लागला आहे. आनंदनगर, कासारवडवली, गायमुख आणि भाईंदरपाडा परिसरातील नागरिकांना घराबाहेर पडताना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला. रविवारी सुट्टीचा दिवस असूनही इतक्या मोठ्या प्रमाणावर कोंडी झाल्याने वाहनचालक आणि प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
