भाईंदर :- संजय गांधी राष्टीय उद्यान परिसरातील माकडे पाणी व अन्नाच्या शोधात ठाणे-घोडबंदर मार्ग ओलांडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी वाहनांचा अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून ठाणे-घोडबंदर हा महत्त्वाचा मार्ग जातो. राज्यातील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी हा एक मार्ग असल्याने त्याच्या रुंदीकरणाचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्यासाठी वन विभागाच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. दरम्यान, मागील काही महिन्यांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे उद्यानातील जंगली प्राणी पाण्याच्या शोधात बाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे.वन विभागाने उद्यानात दोन ठिकाणी टँकरद्वारे पाण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, तरीही काही प्राणी अन्न व पाण्यासाठी शहराच्या दिशेने वळत असल्याचे आढळून येत आहे.
प्रामुख्याने यात माकडांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत आहे. ही माकडे घोडबंदर येथील मुख्य रस्ता ओलांडून घोडबंदर गावाच्या दिशेने जात असल्याचे दिसून येत आहे. अनेकदा वेगाने धावणाऱ्या वाहनांसमोर ही माकडे अचानक रस्त्यावर येतात. त्यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.
यापूर्वीही घोडबंदर मार्गावरील धोकादायक वळणांमुळे अपघातांचे प्रमाण अधिक असून जीवितहानीच्या घटनाही घडल्या आहेत. त्यात आता माकडांचा वाढता वावर वाहनचालकांचे लक्ष विचलित करत असल्याने त्यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील काही दिवसांपासून माकडांच्या वाढत्या वावरामुळे घोडबंदर गावातील नागरिक त्रस्त असल्याचे समोर आले आहे. यासाठी वन विभागाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. मात्र, घोडबंदर मार्गावर माकडांचा वावर वाढला असला तरी अद्याप कोणतेही माकड वाहनाच्या धडकेत जखमी किंवा मृत झाल्याची नोंद नसल्याची माहिती काशिगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांनी दिली आहे.
