ठाणे : घोडबंदर मार्गावरील पातलीपाडा परिसरात बुधवारी दुपारच्या सुमारास एका रिक्षावर रासायनिक टँकर उलटला. या रिक्षामध्ये रिक्षा चालकासह काही प्रवासी दबल्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या अपघातानंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ठाणे, पालघर, मुंबई उपनगर तसेच गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीसाठी घोडबंदर मार्ग हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. उरण येथील जेएनपीए बंदर, नाशिक आणि भिवंडी परिसरातून निघणारी हजारो अवजड वाहने या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्यास त्याचा परिणाम संपूर्ण परिसरातील वाहतुकीवर होतो.

बुधवारी ठाणे येथून घोडबंदर मार्गाच्या दिशेने टँकर वाहतूक करत होता. हा टँकर दुपारी १२ वाजताच्या सुमारास पातलीपाडा परिसरात आला असता, चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टँकर रस्त्यावर उलटला. टँकरच्या बाजूला रिक्षा जात होती. त्या रिक्षावर रायायनिक टँकर उलटला. या रिक्षामध्ये रिक्षा चालकासह काही प्रवासी असल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळताच कासारवडवली पोलीस ठाण्याचे पोलीस, वाहतूक शाखेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ परिसर सुरक्षित करून वाहतुकीचे नियोजन केले. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. हा अपघात इतका भीषण होता की, रिक्षाचा संपूर्ण चुराडा झाला होता. टँकरखाली प्रवासी दबले असल्याने क्रेनच्या साहाय्याने टँकर बाजूला करण्याचे काम केले जात होते. अपघातानंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.