Thane Electricity Crisis: गेल्याकाही दिवसांपासून तापमान वाढीमुळे ठाण्यातील तापमान सरासरी ३५ अंश सेल्सिअस इतके होत असतानाच, रविवारी सकाळी काही तांत्रिक कारणामुळे घोडबंदर, कोलशेत, मानपाडा, वागळे इस्टेट, माजिवडा, बाळकूम जवळील भागात विद्युत पुरवठा खंडीत झाला. या प्रकामुळे येथील नागरिक हैराण झाले असून विद्युत पुरवठा खंडीत असल्याने अनेकांना सकाळी त्याचा फटका सहन करावा लागला. काही भागात सकाळी ११ नंतर विद्युत पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे. लाखो नागरिकांना फटका बसल्याने त्यांच्याकडून संताप व्यक्त केला जात आहे.

ठाणे शहरात महावितरण कंपनीकडून विद्युत पुरवठा केला जातो. ठाण्यातील घोडबंदर, कोलशेत, मानपाडा, वागळे इस्टेट, माजिवडा आणि बाळकूम भागात नागरिकरण वाढल्याने येथे वास्तव्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या दिवसें-दिवस वाढत आहे. उंच इमारतींमध्ये घरे विकत घेऊनही येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रविवारी विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने येथील रहिवाशांचे हाल झाले.

महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, २२० केव्ही पडघा–वाडा आणि २२० केव्ही कोलशेत–खारबाव या वीजवाहिन्या सकाळी ६ वाजल्यापासून ट्रिप झाल्या होत्या. त्यामुळे घोडबंदर परिसरातील काही भागांमध्ये वीजपुरवठ्यावर परिणाम झाला होता.

दरम्यान, या घटनेमुळे घोडबंदर भागातील बहुतांश भागात विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. सुमारे दीड ते दोन तासानंतरही विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. विभागाकडून दावा करण्यात आला आहे की, या वीजवाहिन्या पुन्हा सुरू करण्यात आल्या असून वीजपुरवठा पूर्ववत केला जात आहे. परंतु अनेक ठिकाणी सकाळी ११ नंतर विद्युत पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांची कामे रखडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मागील काही दिवसांपासून १५ ते २० मिनीटांसाठी विद्युत पुरवठा खंडीत केला जात असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने अनेकांना वेळेत घरातील कामे पूर्ण करता आले नाही. चाळी, लोकवस्तीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना उकाड्याचा मारा सहन करावा लागला. ठाण्यातील काही इमारती जुन्या आहेत. विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने येथील उद्वाहक बंद पडले होते. त्यामुळे नागरिकांना जिन्यांवरून चढ-उतर करावी लागली. याचा सर्वाधिक परिणाम वृद्ध, महिला, बालकांवर झाला.