ठाणे : घोडबंदर येथील आनंदनगर भागात डी-मार्ट माॅल जवळ झालेल्या विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू तर एकजण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. रासायनिक टँकर रिक्षावर उलटून अपघात झाला होता. अपघातानंतर प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

रिक्षा चालक दशरथ पवार असे मृताचे नाव असून ते कळवा येथील भीमनगर भागात राहत होते. तर प्रवासी मोहम्मद अमीन यांचा मृत्यू झाला असून ते मूळचे सरलगंज उत्तरप्रदेश येथील आहेत. तर त्यांचे सहकारी अमजित अन्सारी हे जखमी असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठाणे येथून घोडबंदर मार्गाच्या दिशेने टँकर वाहतूक करत होता. हा टँकर दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास आनंदनगर परिसरात आला असता, चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टँकर रस्त्यावर उलटला. टँकरच्या बाजूने रिक्षा जात होती. त्या रिक्षावर रायायनिक टँकरचा मागील टँक उलटला. या अपघातानंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

अपघातात रिक्षा चालक दशरथ पवार यांचा मृत्यू झाला आहे. रिक्षा मधून मोहम्मद अमीन आणि अमजित अन्सारी प्रवास करत होते. त्यापैकी मोहम्मद यांचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, रिक्षाचा पूर्णत: चुराडा झाला. क्रेनच्या साहाय्याने टँकर रिक्षावरून बाजूला करण्यात आला. त्यानंतर टँकर खाली दबलेल्या दशरथ आणि मोहम्मद यांचा मृत्यदेह बाहेर काढण्यात आला. तर जखमी अमजित यांना ओवळा येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. या अपघातामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.