ठाणे : घोडबंदर मार्गावरील पातलीपाडा उड्डाणपुलाजवळ बुधवारी टेम्पो आणि रासायनिक पदार्थ वाहून नेणाऱ्या टँकरमध्ये झालेल्या अपघातामुळे घोडबंदर मार्गावर दोन्ही दिशेकडे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या प्रवाशांना या कोंडीचा मोठा फटका बसला. अनेक नोकरदारांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आले नाही.
घोडबंदर मार्गावर कळवा येथून भाजीपाला घेऊन एक टेम्पो ओवळ्याच्या दिशेने जात होता. हा टेम्पो पातलीपाडा उड्डाणपुलाच्या चढणीवर आला असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे टेम्पो दुभाजकाला धडकला. याचदरम्यान मागून येणाऱ्या टँकरची टेम्पोला धडक बसली. हा टँकर उरण येथील जेएनपीए बंदरातून गुजरातच्या दिशेने निघाला होता. टँकरमधून २० हजार लिटर रासायनिक पदार्थाची वाहतूक केली जात होती
अपघाताची माहिती मिळताच कासारवडवली आणि चितळसर-मानपाडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी, वाहतूक शाखेचे अधिकारी, अग्निशमन दलाचे जवान, ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे जवान तसेच विद्युत विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातात विद्युत खांब रस्त्यावर कोसळला होता. तो बाजूला करण्यात आला. मात्र, टँकरमधील रासायनिक पदार्थ रस्त्यावर सांडला होता. तसेच टँकर उलटल्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.
दरम्यान, सकाळी वाहनांची संख्या वाढू लागल्यानंतर घोडबंदर मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला आणि दोन्ही दिशांना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सकाळी ९.३० नंतरही घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर पातलीपाडा ते कापूरबावडी येथील तत्त्वज्ञान विद्यापीठापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवर वाघबीळपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे प्रवासी, नोकरदार आणि वाहनचालकांचे मोठे हाल झाले.
