भाईंदर : सोमवारी सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे-घोडबंदर मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.येथील घाटमार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहने बंद पडणे, अपघात होणे आणि परिणामी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होण्याच्या घटना घडत आहेत.
हवामान खात्याने ठाणे जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिला असून, सकाळपासून घोडबंदर परिसरात मुसळधार पावसासह जोरदार वारे वाहत आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह येत असल्याने करपे कंपाऊंड परिसरात रस्त्यावर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनचालकांना समोरील रस्ता स्पष्ट दिसणे कठीण होत असून वाहन चालविणे धोकादायक बनले आहे.
या परिस्थितीत गायमुख येथील घाटमार्गावर एका अवजड वाहनाचा अपघात झाला. तसेच अनेक चारचाकी वाहनांच्या इंजिनमध्ये पाणी गेल्याने ती रस्त्यातच बंद पडली. त्यामुळे ठाणे आणि मिरा-भाईंदरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली.
घटनेची माहिती मिळताच काशिमीरा वाहतूक शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त अवजड वाहने रस्त्याच्या कडेला हटविण्याचे काम सुरू करण्यात आले असून, बंद पडलेली वाहनेही बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. सध्या घोडबंदर मार्गावर दहापेक्षा अधिक वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे.अनावश्यक प्रवास टाळावा तसेच अत्यावश्यक काम असल्यासच या मार्गाचा वापर करावा, असे आवाहन काशिमीरा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल वाघ यांनी वाहनचालकांना केले आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावर खबरदारी
मिरा-भाईंदर व वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पाणी साचण्याची शक्यता असलेली ठिकाणे वाहतूक पोलिसांनी पूर्वीच निश्चित केली आहेत. त्या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, अतिरिक्त वाहतूक पोलिसांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महामार्गावरील वाहतुकीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
