ठाणे : घोडबंदर मार्गावर वाहनांचा भार वाढल्याने मंगळवारी सकाळी वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीमुळे घोडबंदरहून ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने आणि मुंबई नाशिक महामार्गाने प्रवास करणाऱ्यांचे हाल झाले. अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही.

घोडबंदर मार्गावरील कापूरबावडी ते गायमुख भागातून हजारो वाहन चालक माजिवडा मार्गे ठाणे रेल्वे स्थानक किंवा मुंबई नाशिक महामार्गाने नवी मुंबई, मुंबई आणि भिवंडीच्या दिशेने प्रवास करतात. मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास वाहन चालकांचा भार वाढल्याने माजिवडा चौकात वाहतूक कोंडी झाली. त्याचा परिणाम घोडबंदर मार्गावर बसला. माजिवडा ते तत्वज्ञान विद्यापीठ भागातील वाहतूक व्यवस्थेवर झाला. मुख्य मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही वाहन चालकांनी अंतर्गत मार्गाचा वापर केला. परंतु अंतर्गत मार्गावरही वाहनांचा भार वाढून वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे सकाळी कामानिमित्ताने घराबाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले.

अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही. सकाळी तापमान देखील वाढले होते. त्यामुळे उन्हाचा ताप सहन करत प्रवाशांना प्रवास करावा लागला. दुपारी १ नंतरही येथील वाहतूक पूर्णपणे सुटली नव्हती. या बाबत वाहतूक पोलीस नियंत्रण विभागाला विचारले असता, वाहनांचा भार वाढल्याने कोंडी झाली होती. परंतु कोंडी सोडविण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.