Thane Ghodbunder Road Update: मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टँकर उलटून तब्बल ३२ तास वाहतूक कोंडी झाल्याची घटना बुधवारी घडली असतानाच, ठाण्यासह घोडबंदर मार्गावर गुरुवारी वाहतूक कोंडी झाली. मुंबई–नाशिक महामार्गावरील ठाण्यातील रुस्तमजी गृहसंकुलासमोर अवजड वाहनाचा अपघात झाल्याने ठाणे आणि नाशिक मार्गिकेवरील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली. परिणामी, घोडबंदर आणि ठाणे मार्गिकेवर कोंडी झाली. त्याचा फटका शाळेच्या बसगाड्यांना बसला आहे.

मुंबई–नाशिक महामार्गावरील ठाण्यातील रुस्तमजी गृहसंकुलासमोर अवजड वाहनाचा अपघात झाला. हे वाहन नाशिकहुन ठाण्याच्या दिशेने येत होते. अपघातानंतर हे वाहन नाशिक दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर गेले. यामुळे ठाणे आणि नाशिक मार्गिकेवरील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली. या अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, अनेक वाहनचालकांना तासन्तास कोंडीत अडकून पडावे लागले. दुपारच्या वेळेत कामावर जाणाऱ्या तसेच अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. या कोंडीचा परिणाम घोडबंदर मार्गावरून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवरही झाला. या कोंडीत शाळेच्या बसगाड्यांना अडकून पडल्याने विद्यार्थ्यांचे हाल झाले आहे.

माजीवडा ते मानपाडा दरम्यान वाहनांची वाहतूक संथगतीने

सुरू होती. त्यातच अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने कोंडी आणखी वाढली. दरम्यान, माजीवडा पुलावर दोन वाहनांची धडक झाल्याने काही काळ वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. त्यामुळे आधीच कोंडीत अडकलेल्या वाहनचालकांच्या त्रासात अधिक भर पडली. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र महामार्गावरील मोठ्या प्रमाणावरील वाहतूक आणि अवजड वाहनांची वर्दळ यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बराच वेळ लागला.