ठाणे : घोडबंदर मार्गावर मंगळवारी सकाळी ट्रक बंद पडल्याने तसेच दिवसभर सुरू असलेल्या संततधारेमुळे वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे ठाणे, भिवंडी येथून घोडबंदर, वसई-विरारच्या दिशेने प्रवास करणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले.
ठाणे येथून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणारा ट्रक मार्गावर बंद पडला. यामुळे पातलीपाडा, मानपाडा, कापूरबावडी परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे हलकी वाहने, बसगाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
अवघ्या १० मिनीटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना सुमारे २० ते २५ मिनीटे अडकून पडावे लागत होते. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. तर पावसामुळे वाहनांचा वेग मंदावून कोंडीत अधिकच भर पडली.
