ठाणे: भातसा नदीच्या बंधाऱ्यातील पाणी पातळी वाढविण्यासाठी मुंबई महापालिकेकडून न्युटिक गेट सिस्टीमची दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने त्याचा परिणाम ठाणे शहरातील पाणी पुरवठ्यावर झाला आहे. शहरातील पाणी पुरवठ्यात २० टक्के कपात झाल्याने पालिकेने विभागवार एक दिवस पाणी कपातीचे वेळापत्रक जाहीर केले असले तरी, ठरवून दिलेल्या दिवसाआधीच ठाणे तसेच घोडबंदर भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होऊ लागल्याने येथे टंचाईच्या समस्या निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

ठाणे आणि मुंबई महापालिका भातसा नदीच्या पात्रातील पिसे बंधाऱ्याजवळून पाणी उचलून त्याचा शहरात पुरवठा करते. या नदीच्या बंधाऱ्यातील पाणी पातळी खाली गेल्याने मुंबई महापालिकेला पुरेशा पाण्याचा उपसा करणे शक्य होत नाही. त्यावर उपाय म्हणून या बंधाऱ्यातील पाणी पातळी वाढविण्यासाठी मुंबई महापालिकेने न्युटिक गेट सिस्टीमची दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्याचा परिणाम ठाणे शहराच्या पाणी पुरवठ्यावर झाला आहे. मुंबई महापालिकेच्या बंधाऱ्या शेजारीच ठाणे महापालिकेने पाणी उपसा करण्यासाठी बंधारा बांधलेला आहे. मुंंबई महापालिकेकडून न्युटिक गेट सिस्टीमची दुरुस्तीचे काम सुरू असल्याने ठाणे महापालिकेच्या बंधाऱ्यातील पाणी पातळी खालावली आहे. परिणामी, शहरातील पाणी पुरवठ्यात २० टक्के कपात झाली आहे.

ठाणे शहरातील नागरिकांना दररोज पाणी टंचाई सहन करावी लागू नये म्हणून पालिकेने ७ फेब्रुवारीपर्यंत विभागवार एक दिवस पाणी कपातीचे वेळापत्रक जाहीर केले होते. परंतु ठरवून दिलेल्या दिवसाआधीच ठाणे तसेच घोडबंदर भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होऊ लागल्याने येथे टंचाईच्या समस्या निर्माण झाली आहे. दरम्यान, घोडबंदर भागात पाणी पुरवठा करणारी जलवाहीनीमधून पाणी गळती होत असून यामुळे या भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. ही वाहिनी दुरुस्त करण्याचे काम सुरू असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ठाणे महापालिकेने पाणी कपातीचे वेळापत्रक जाहीर केले होते. परंतु हे वेळापत्रक कोलमडले असून ठाणे आणि घोडबंदर भागात नेहमीपेक्षा कमी दाबाने पाणी पुरवठा होत असून टंचाईच्या सर्वाधिक झळा घोडबंदर भागाला बसत आहेत. यावरून नागिकांमधून संताप व्यक्त होत आहे. आनंदनगर येथील श्री वृष्टी सोसायटीचे अध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितले, आमच्या भागात ३ फेब्रुवारी ही पाणी कपातीची तारीख होती. परंतु गेल्या दोन दिवसांपासून कमी दाबाने पाणी सुरू झाल्याने टंचाई जाणवू लागली आहे. कासारवडवली येथील एव्हरेस्ट कंट्री सोसायटीचे रहिवाशी विजय जगताप यांनी सांगितले, पाणी कपातीच्या तारखेआधीच आमच्याकडे कपात लागू झाल्याने टंचाई जाणवत आहे.