ठाणे : मुंबई महानगरातील वाहतूकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी मुख्य आणि सेवा रस्ता जोडणी प्रकल्प राबवून रस्ता रुंद करण्यात आला. परंतु रस्त्याच्या मधोमध उभे असलेले विद्युत खांब, रस्त्यावर पसरलेली वाळू, उंच-सखल रस्ते, आणि सेवा रस्त्यांप्रमाणेच दुहेरी सुरू असलेली वाहतूक या कारणास्तव रुंदीकरणानंतरही अपघातांचे धोके वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहनचालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
घोडबंदर रस्ता हा मुंबई महानगरातील वाहतूकीसाठी महत्वाचा मानला जातो. या मार्गावरून उरण येथील जेएनपीटी बंदर, गुजरात, मुंबई अशी अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. याशिवाय, स्थानिक नागरिकांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. या मार्गाच्या दोन्ही बाजूला सेवा रस्ते होते. घोडबंदर मार्गावर गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी मुख्य आणि सेवा रस्ते जोडणी प्रकल्प राबवून रस्ता रुंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयामुळे सेवा रस्त्यावरील बेकायदा पार्किंग बंद होऊन या रस्त्याचा वाहतूकीसाठी वापर होईल, असे दावे करण्यात आले होते. या प्रकल्पाचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू असून त्यात मुख्य आणि सेवा रस्ता जोडून काँक्रीटचा रस्ता तयार करण्याबरोबरच रस्त्याच्या कडेला गटार, पथपथ तयार करण्याचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी ही कामे पुर्ण झालेली आहेत. असे असले तरी, यापुर्वी मुख्य आणि सेवा रस्त्यांच्या दुभाकांवर उभारण्यात आलेले उच्च दाब विद्युत वाहीनीचे खांब, जलवाहीन्या मात्र, हटविण्यात आलेल्या नाहीत. रुंदीकरणानंतर वेगाने धावणारी वाहने या खांबांना धडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रकाश अपुरा असल्याने धोका अधिक वाढला आहे.
मुख्य आणि सेवा रस्ता जोडले गेले असले तरी वाहतूक व्यवस्था अद्यापही पूर्णपणे सुव्यवस्थित झालेली नाही. अनेक ठिकाणी वाहतूक पुर्वी प्रमाणेच सेवा रस्त्याच्या पद्धतीनेच सुरू आहे. रस्त्यावर विद्युत दिवे नसल्यामुळे अंधार असतो आणि त्यात वाहने समोरसमोरून वेगाने येत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. दरम्यान, काही भागांत रस्त्यावर वाळू साचलेली दिसून येत आहे. त्यामुळे दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना वाढल्या आहेत.
या रस्त्यावर वाहने वेगाने वाहतूक करीत असल्याने मोठा अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे. याशिवाय, काँक्रीट रस्ते तयार करण्यात आले असले तरी काही ठिकाणी त्यांना डांबरी रस्त्यांशी जोडण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावर उंच-सखल भाग निर्माण झाले असून, विशेषतः चौकांमध्ये रस्त्यांची दुरावस्था झाली असून परिणामी दुचाकीस्वारांचा तोल जाऊन अपघात घडत आहेत. या रस्त्यावरील त्रुटी तातडीने दूर करून सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
मुख्य आणि सेवा रस्ता जोडणीनंतरही रस्त्याच्या मधोमध उभे असलेले विद्युत खांब आहेत. रुंदीकरणानंतर वाहनांचा वेग वाढला असून एखादे वाहन खांबाला धडकून अपघात होण्याची शक्यता आहे. रस्त्यांवर वाळू पसरलेली असल्याने त्यावरून दुचाकी घसरत आहेत. रुंदीकरणानंतही पुर्वीप्रमाणेच वाहतूक सुरू असल्याने वाहनांची समोरासमोर धडक होण्याची भीती आहे. याबाबत तक्रारी केल्या आहेत. – गिरीश पाटील सदस्य, जस्टीस फाॅर घोडबंदर
घोडबंदर रस्त्याचे काम तुकड्या-तुकड्यात करण्यात येत आहे. पदपथांची निर्मीती केली असली तरी त्यावर दुचाकी पार्क केल्या जात आहेत. नागरिकांना चालण्यासाठी पदपथ उपलब्ध होत नाहीत. रस्त्यावर वाळू पसरलेली असल्याने त्यावरून दुचाकी घसरून अपघात होत आहेत. अनेकांना जीव गमवावा लागला आहे. याबाबत आम्ही आंदोलने सातत्याने करतोय. पण, प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे.-उमेश काळे, सदस्य, जस्टीस फाॅर घोडबंदर
