ठाणे : घोडबंदर परिसरात पाणीटंचाई तीव्र होत असताना गृहसंकुलांमधील ५० हून अधिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकल्पांमुळे सुमारे २५ टक्के पाण्याचा पुनर्वापर शक्य असतानाही अनेक प्रकल्प नादुरुस्त असून काही अद्याप सुरूच झाले नसल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, महापालिकेने आठवडाभरात कृती आराखडा राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

घोडबंदर भागातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार संजय केळकर यांनी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता, शहर विकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच हिरानंदानी इस्टेट, ऋतू पार्कमधील प्रतिनिधी आणि स्थानिक नगरसेवकांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत घोडबंदर परिसरात पाणीटंचाई तीव्र होत असताना गृहसंकुलांमधील ५० हून अधिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

हिरानंदानी इस्टेट, ऋतू पार्कसह विविध गृहसंकुलांमधील १५ नादुरुस्त सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प असून ३० पेक्षा अधिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरूच झाले नसल्याची माहिती समोर आली. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित झाल्यास पुनर्वापरातून सुमारे २५ टक्के पिण्याच्या पाण्याची बचत होऊ शकते. त्यामुळे घोडबंदर भागातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी हे प्रकल्प तातडीने सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे केळकर यांनी बैठकीत मांडली. यावेळी झालेल्या चर्चेनंतर हे प्लांट सुरू करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला. आठवडाभर यावर काम करण्यात येणार असून त्यानंतर आढावा बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती केळकर यांनी माध्यमांना दिली.

१६ लघुउद्योगांना दिलासा

वागळे परिसरातील फेऱोडाय कंपाऊंडमधील औद्योगिक क्षेत्रातील सुमारे १६ लघु उद्योगांना ठाणे महानगरपालिकेकडून क्लस्टर योजना राबविण्यासाठी ४८ तासांत पाडकामाच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे ३५० हून अधिक कामगार आणि त्यांच्या १४०० पेक्षा अधिक सदस्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. बुधवारी आमदार संजय केळकर यांनी स्थळपाहणी करत बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांनी गुरुवारी आयुक्त सौरभ राव यांची महापालिकेत भेट घेऊन लघु उद्योजकांची व्यथा मांडली. यावेळी आयुक्तांनी योग्य तोडगा काढण्यात येऊन या लघु उद्योगांवर अन्याय होऊ देणार नसल्याचे सांगितले.