ठाणे : नाशिकमधील रामकुंड परिसरात दररोज सायंकाळी होणाऱ्या गोदा आरतीची अनुभूती ठाण्यात अनुभवण्यास मिळणार आहे. हा एक दैदिप्यमान सोहळा असून या गोदा आरतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी ठाणेकरांनी आज, सायंकाळी ७ वाजता कचराळी तलाव येथे उपस्थित रहावे असे आवाहन श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास कडून करण्यात आले आहे.

श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्या माध्यमातून गेली २५ वर्षे गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त ठाणे शहरात भव्य स्वागत यात्रेचे आयोजन केले जाते. या यात्रेला ठाणेकरांचा मोठा प्रतिसाद मिळत असून यंदा या स्वागत यात्रेचे २६ वे वर्ष आहे. या निमित्ताने दरवर्षी गुढीपाडव्याच्या तीन ते चार दिवस आधीपासून शहरात विविध सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम राबविले जातात.

मागील वर्षी स्वागत यात्रेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त उपवन तलावावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी घाट येथे प्रथमच हरिद्वारची अनुभूती देणारी गंगा महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या आरतीसाठी खास वाराणसी येथील पंडित आले होते. या माध्यमातून ठाणेकरांना हरिद्वारची गंगाआरती प्रत्यक्ष अनुभूवता आली होती.

ही परंपरा कायम ठेवत यंदाच्या वर्षी श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाने नाशिक येथील रामकुंड परिसरात दररोज सायंकाळी होणाऱ्या गोदा आरतीचे आयोजन केले आहे.नाशिकमधील रामकुंड परिसरात होणारी गोदा आरती ही भाविकांसाठी मोठे आकर्षण असते. ज्या नागरिकांना नाशिक येथे जाऊन या आरतीचा अनुभव घेता आलेला नाही अशा नागरिकांसाठी ही अनोखी संधी आहे. या आरतीत नदीची पूजा करून तिच्या पावित्र्याचे जतन करण्याचा संदेश दिला जातो.

नाशिकच्या धर्तीवर ठाण्यातही हा आध्यात्मिक सोहळा आयोजित करुन ठाणेकरांना एक वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न आयोजकांकडून केला जात आहे. या आरतीसाठी विशेषतः नाशिक येथील अनुभवी पुरोहित मंडळी ठाण्यात येणार असून नाशिकमध्ये ज्या पद्धतीने गोदा आरती केली जाते, त्याच पद्धतीने ही भव्य गोदा आरती आज, सायंकाळी ७ वाजता पाचपाखाडी येथील कचराळी तलाव परिसरात होणार आहे. या वेळी पारंपरिक पद्धतीने मंत्रोच्चार, शंखनाद आणि दीपप्रज्वलनासह आरती केली जाणार आहे, असे आयोजकांनी सांगितले.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदा आरतीचे आयोजन…

आगामी वर्षात नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदा आरतीचे आयोजन ठाण्यात करण्यात आले आहे. ठाणेकरांना या धार्मिक परंपरेची ओळख व्हावी आणि कुंभमेळ्याबाबत जनजागृती व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाकडून सांगण्यात आले.