मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे विराजमान झाल्यानंतर नेटकऱ्यांनी समाज माध्यमावर मुख्यमंत्री शिंदे यांचे अभिनंदन करण्या बरोबरच कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत सुरू असलेले रस्ते, पुलांचे प्रकल्प गतीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. कल्याण-शीळफाटा रस्त्याचे संथगती काम, गेल्या सहा वर्षापासून सुरू असलेले मोठागाव रेतीबंदर खाडीवरील माणकोली उड्डाण पुलाच्या संथगती कामामुळे प्रवासी हैराण आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री पदाचा मान ठाणे जिल्ह्याला मिळाल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील सर्व महत्वाचे रस्ते, उड्डाण पूल प्रकल्प पूर्ण होतील, अशी अपेक्षा व्यक्त करून नेटकऱ्यांनी कल्याण-शीळफाटा रस्त्याचे रडतखडत सुरू असलेले काम लवकर पूर्ण करून प्रवाशांना दिलासा द्यावा. शीळफाटा रस्त्याच्या नंतर सुरू झालेली बहुतांशी रस्ते कामे पूर्ण झाली तरी शीळफाटा रस्ते काम का पूर्ण केले जात नाही याचा आढावा घेण्यात यावा. शीळफाटा रस्त्याच्या २७ गाव भागात रुंदीकरणासाठी जमीन मिळत नसल्याने या भागातील शेतकरी, जमीन मालकांचे प्रश्न ऐकून या भागातील रस्ता रुंदीकरण आणि काँक्रीटीकरणाचे काम विनाविलंब मार्गी लागेल यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे.

डोंबिवली पश्चिमेत मोठागाव रेतीबंदर खाडी भागात माणकोली पुलाचे कामे गेल्या सहा वर्षापासून सुरू आहे. या पुलाचे काम ठेकेदाराला तीन वर्षात पूर्ण करायचे होते. हे काम तीन वर्ष रेंगाळले आहे. त्यामुळे या कामाला गती देऊन डोंबिवली-ठाणे-मुंबई प्रवाशांना दिलासा देण्यात यावा. माणकोली पूल पूर्ण झाल्यानंतर डोंबिवली-ठाणे प्रवास २५ मिनिटात करता येणार आहे. या पुलामुळे डोंबिवलीतील प्रवाशांना भिवंडी बाह्यवळण रस्ता किंवा कल्याण शीळफाटा रस्ता मार्गे न जाता माणकोली पुलावरून थेट ठाणे, मुंबईत विनाअडथळा जाण्याचा मार्ग उपलब्ध होणार आहे.

कल्याण शीळफाटा रस्ता, माणकोली उड्डाण पूल पूर्ण झाल्यानंतर अनेक वर्ष वाहतूक कोंडीच्या गजबजाटाला कंटाळलेले अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, उल्हासनगर, डोंबिवली, भिवंडी भागातील प्रवासी मोकळा श्वास घेतील, असा विश्वास नेटकऱ्यांनी समाज माध्यमातून व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापनेत पडद्या मागून डोंबिवलीचे आमदार, माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी रवींद्र चव्हाण खूप सख्य असल्याने आ. चव्हाण यांनी आपल्या हद्दीतील हे दोन्ही महत्वाचे रस्ते, पूल प्रकल्प मार्गी लावावेत, अशी मागणी नागरिकांकडूनही केली जात आहे.

२७ गाव सर्व पक्षीय संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शीळफाटा रस्ता रुंदीकरणात बाधित शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढाकार घेऊन अनेक वर्ष रखडलेला हा विषय मार्गी लावून शेतकऱ्यांना दिलासा आणि रस्ते कामात असलेला अडथळा दूर करावा, अशी मागणी केली आहे.

ठाणे जिल्ह्याला प्रथमच मुख्यमंत्री पदाचा मान मिळाला आहे. त्यामुळे या भागातील विकास कामे मार्गी लागतील. नवीन कामांना भरपूर निधी मिळेले. त्याच बरोबर सुरू असलेली शीळफाटा रस्ता, माणकोली पूल, ठाकुर्ली उड्डाण पूल ते ९० फुटी रस्ता ही कामे निधी कमी पडू न देता मार्गी लागतील, असा विश्वास आहे, असे नेटकरी भूषण पांडे यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane got the post of chief minister kalyan shilphata mankoli bridge should be built amy
First published on: 05-07-2022 at 15:19 IST