ठाणे – ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘माझं गाव-आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला ठाणे जिल्ह्यात अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून जिल्ह्यातील सर्व ४२७ ग्रामपंचायती या अभियानात सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावात आता आरोग्याचा मंत्र पोहोचू लागला असून गावागावांत विविध आरोग्यविषयक उपक्रमांची चळवळ उभी राहत आहे. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. ग्रामीण भागात आरोग्यविषयक जनजागृती, तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती देण्यात आली आहे.

“माझं गाव -आरोग्य संपन्न गाव ” हे महत्त्वाकांक्षी अभियान असून ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य अधिक सक्षम, सजग आणि निरोगी बनविणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. या अभियानांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर आरोग्य कृती आराखडा तयार करून मोफत आरोग्य तपासणी, विविध आजारांचे निदान व उपचार, पोषण व स्वच्छतेबाबत जनजागृती, किशोरवयीन आरोग्य उपक्रम, योग प्रशिक्षण, नेत्ररोग व कीटकजन्य आजार प्रतिबंध मोहीम, तसेच पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण यांसारखे विविध उपक्रम राबविले जात आहेत. स्थानिक प्रशासन, आरोग्य विभाग, आशा स्वयंसेविका आणि ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून गावागावांत आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी हे अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व ४२७ ग्रामपंचायतींची नोंदणी झाली असून हे अभियान राबविण्यास सुरुवात झाली आहे. या अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत तालुका स्तरावर पाच, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ३३ आणि उपकेंद्र स्तरावर १७५ आरोग्य मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यांमध्ये नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, विविध आजारांचे निदान, उपचार आणि शासनाच्या आरोग्य योजनांची माहिती दिली जात आहे. परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

जून महिन्यात अभियानाला आणखी व्यापक स्वरूप देण्यात येणार असून प्रत्येक ग्रामपंचायतीत आरोग्य संपन्न गाव कृती दल समितीच्या बैठका घेऊन स्थानिक गरजांनुसार आरोग्य कृती आराखडा तयार केला जाणार आहे. शाळा आणि अंगणवाड्यांमधील बालकांना स्वच्छता व सकस आहाराचे महत्त्व पटवून देण्याबरोबरच किशोरवयीन मुलामुलींसाठी विशेष आरोग्य मार्गदर्शन, जीवन कौशल्य प्रशिक्षण आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. येत्या १० ते १६ जूनदरम्यान जिल्हाभर नेत्ररोग जनजागृती सप्ताह राबविण्यात येणार असून डोळ्यांच्या आरोग्याबाबत विशेष जनजागृती केली जाणार आहे. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया यांसारख्या कीटकजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे.

आरोग्यासोबत पर्यावरण संवर्धनालाही अभियानात महत्त्व देण्यात आले असून गावागावांत वृक्षारोपण कार्यक्रम राबविले जाणार आहेत. निरोगी जीवनशैलीसाठी योगाचे महत्त्व पटवून देत दररोज किमान १०० नागरिकांना योग प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय घरगुती कचऱ्याचे वर्गीकरण, स्वच्छता आणि आरोग्यदायी परिसर निर्मितीसाठी विशेष जनजागृती मोहीमही राबविण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, ग्रामपंचायती, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि विविध विभागांच्या समन्वयातून हे अभियान राबविण्यात येत आहे.