कल्याण : ठाणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत पाच तालुक्यांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर २५ ते ३० वर्षांपासून सुमारे ३०० ते ४०० कायम १० टक्के कोट्यातील कर्मचारी पदोन्नत्तीच्या प्रतीक्षेत आहेत. नोकरीत राहिलेला सेवाकाळ आणि पदोन्नत्तीसाठी वयोमर्यादा यांचा मेळ चुकला तर, आपल्या उर्वरित सेवा काळातील आर्थिक लाभाच्या सर्व संधी जातील या विचाराने कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर ३० वर्षापासून ग्राम विकास अधिकारी यांना सहाय्यक म्हणून अनेक कर्मचारी काम करत आहेत. शिपाई संवर्गातील हे कर्मचारी वयाच्या १८ ते २० व्या वर्षापासून ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून नोकरीला लागले. जिल्हा परिषदेने या कर्मचाऱ्यांची प्रशासकीय कामकाज क्षमता तपासून त्यांना सेवेत त्यांच्या सेवाज्येष्ठतेप्रमाणे कायम केले. हे कर्मचारी सेवेत कायम झाल्यानंतर त्यांना पदोन्नत्ती देण्यासाठी जिल्हा परिषदेकडून दरवर्षी प्रतीक्षा यादी तयार करण्यात येते. त्याप्रमाणे या ग्रामपंचायत स्तरावरील १० टक्के कोट्यातील कर्मचाऱ्यांना लिपिक संवर्गात प्रतीक्षा यादीतील अनुक्रमांकाप्रमाणे पदोन्नत्ती जिल्हा परिषदेकडून देण्यात येते.

तीन वर्षापूर्वी अशाप्रकारचा लाभ काही कर्मचाऱ्यांना मिळाला, मात्र काही कर्मचारी अद्याप प्रतीक्षा यादीतील अनुक्रमांकाप्रमाणे आपला पदोन्नत्तीमध्ये क्रमांक लागेल यासाठी धडपडत आहेत. पदोन्नत्तीचे काम झाले नाहीतर आपली ग्रामपंचायत स्तरावरील ३० वर्षाची सेवा फुकट जाईल, अशी भीती ग्रामस्तरावरील सहाय्यक कर्मचाऱ्यांना आहे. ठाणे जिल्हा परिषदेत विविध विभागांमध्ये कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त होतात, त्याप्रमाणे आम्हाला तातडीने त्याठिकाणी पदोन्नत्ती द्यावी, अशी मागणी ग्रामपंचायत स्तरावरील कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

अनेक वर्ष ग्रामपंचायत स्तरावर सेवा करूनही कायम झाल्यानंतर आपणास पदोन्नत्ती मिळत नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. जिल्हा परिषदेकडून दरवर्षीप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचारी सेवा जेष्ठता यादी १ जानेवारीला प्रसिद्ध केली जाते. जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागमध्ये ही प्रक्रिया केली जाते. २०२५ पासून ग्रामपंचायतीने यादी प्रसिद्ध केली नाही. सन २०२६ मधील यादी अद्याप तयार करण्यात आलेली नाही याविषयी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

प्रतीक्षा यादीचे श्रेणीकरणाचे काम सुरू

जिल्हा परिषदेमधील वरिष्ठांकडून माहिती घेऊन जिल्हा परिषदेच्या जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्याने सांगितले, की ग्रामपंचायत स्तरावरील १० टक्के कोट्यातील कायम कर्मचाऱ्यांची प्रतिक्षा यादी दरवर्षी तयार केली जाते. मागील वर्षीची प्रतीक्षा याद्या तालुका स्तरावर तयार करण्यात येऊन त्या अंतीम मंजुरीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडे आल्या आहेत. चालू वर्षीच्या प्रतीक्षा यादीचे श्रेणीकरणाचे काम सुरू आहे. जिल्हा परिषदेत जागा रिक्त होतात त्याप्रमाणे प्रतीक्षा यादीतील अनुक्रमांकाप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावरील १० टक्के कोट्यातील कर्मचाऱ्यांना प्रशासकीय विहित प्रक्रिया पूर्ण करून पदोन्नत्ती आणि पदस्थापना देण्यात येतात.