ठाणे : येत्या गुरुवारी गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्षाची सुरुवात होणार आहे. यानिमित्त शहरात विविध पक्षांकडून गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या स्वागतानिमित्त नागरिकांना शुभेच्छा देणारे फलक मोठ्याप्रमाणात उभारण्यात आले आहेत. शहरातील चौक, स्थानक परिसराजवळील रस्ते, गल्ली-बोळात विशेष करुन स्वागत यात्रा निघणाऱ्या मार्गावर हे फलक उभारण्यात आल्याने ठाणे शहराची स्थिती अत्यंत विद्रूप झाली आहे. या फलकबाजीमुळे शहरातील सूजान नागरिकांकडून मात्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
ठाणे शहरात गेली अनेक वर्षे गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास या संस्थेच्यावतीने स्वागत यात्रा काढली जाते. भव्य स्वरुपात निघणाऱ्या या स्वागत यात्रेत शहरातील विविध संस्था, गृहसंकुले, शाळा, महाविद्यालये जोडल्या जातात. तलावपाळी येथून निघणारी ही स्वागत यात्रा पुढे आराधना सिनेमा, हरी निवास चौक, गोखले रोड, राम मारुती रोड, पु.ना. गाडगीळ चौक तलाव पाळी मार्गे पुन्हा राम गणेश गडकरी रंगायतन येथे येते. या स्वागत यात्रेत उपमुख्यमंंत्री एकनाथ शिंदे तसेच इतर पक्षाचे नेते, पदाधिकारी देखील सहभागी होत असतात.
मागील गेले काही वर्षात गुढीपाडव्यानिमित्त शहरात इतक्या प्रमाणात फलकबाजी करण्यात आली नव्हती. परंतू यंदाच्या वर्षी शहरातील मुख्य रस्त्यांवर, चौकाचौकात विशेष करुन स्वागत यात्रा निघणार आहे त्या मार्गावर नागरिकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देणारे फलक उभारण्यात आले आहेत. हरिनिवास चौक, नौपाडा पोलीस स्टेशन जवळ, गोखले रोड तसेच स्थानक परिसराजवळ शिवसेना (शिंदे गट ) पक्षाकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र असलेले आणि नागरिकांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदु नववर्षाच्या शुभेच्छा देणारे फलक मोठ्या संख्येने उभारलेले पाहायला मिळत आहेत. तर, भाजप च्या काही स्थानिक नेत्यांकडून देखील शुभेच्छाचे फलक लावण्यात आले आहेत. या फलकबाजीमुळे शहर विद्रुप झाले असल्याची भावना काही सुजान नागरिकांनी व्यक्त केली आहे.
