ठाणे – आर्थिक दुर्बलतेमुळे अनेकांना न्यायालयात जाणे शक्य होत नाही. त्यामुळे समाजातील सर्व स्तरांपर्यंत न्यायव्यवस्था आणि न्याय प्रक्रियेची माहिती पोहोचावी, या उद्देशाने यंदा गुढीपाडवा स्वागत यात्रेत अधिवक्ता परिषदेच्या वतीने ‘संविधान आणि न्याय सर्वांसाठी’ या विषयावर चित्ररथ साकारण्यात येणार आहे. अशी माहिती अधिवक्ता परिषचे प्रतिनिधी सुयत्न धाक्रस यांनी दिली. गुढीपाडव्याच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या स्वागत यात्रेच्या नियोजनासाठी सोमवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्या वतीने दरवर्षी गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी ठाणे शहरात भव्य स्वागत यात्रा काढली जाते. या यात्रेत शहरातील विविध संस्था एकत्र येऊन सामाजिक, सांस्कृतिक व जनजागृतीपर संकल्पनांवर आधारित चित्ररथ सादर करतात. या माध्यमातून समाजाला विविध संदेश दिले जातात. यंदा या स्वागत यात्रेचे २६ वे वर्ष असून न्यासाकडून महिनाभर आधीपासून तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. स्वागत यात्रेच्या नियोजनासाठी दर सोमवारी बैठक आयोजित करण्यात येते.

सोमवारी पार पडलेल्या बैठकीत शहरातील ३९ संस्थांचा सहभाग होता. यंदा शहरात एकूण १४ उपयात्रा निघणार असल्याची माहिती न्यासाकडून देण्यात आली. यंदा अधिवक्ता परिषद या संस्थेचा स्वागत यात्रेत पहिल्यांदाच सहभाग आहे. त्यांच्यावतीने साकारण्यात येणाऱ्या चित्ररथात लहान मुले पोलिस, वकील आणि न्यायाधीशांच्या वेशभूषेत सहभागी होणार आहेत.

तसेच ठाणे ऑटोलॉजिस्ट असोसिएशनकडून ‘काच बिंदू’ या आजाराबाबत जनजागृती केली जाणार असून यासाठी सर्व डॉक्टर सहभागी होणार आहेत. नृत्यधारेसाठी ४० संस्थांची नोंदणी झाली आहे. घंटाळी मंदिर संस्थेकडून घंटाळी देवीची पालखी असणार आहे. जिम्नॅस्टिक संस्थेकडून हिंदू सणांचे दर्शन घडवणारे सादरीकरण केले जाणार आहे.

शारदा विद्या मंदिरकडून ‘समर्थ ठाणे, सशक्त भारत’ या विषयावर चित्ररथ असणार आहे. ब्रह्माकुमारी संस्थेकडून ‘स्वच्छ ठाणे, व्यसनमुक्त ठाणे’ हा संदेश देणारा चित्ररथ असणार आहे. राबोडी येथील आकाशगंगा फेडरेशनकडून प्लास्टिक वापराच्या दुष्परिणामांवर आधारित चित्ररथ साकारण्यात येणार आहे. कर्नाटक सेवा संस्थेकडून यक्षगान नृत्य सादर केले जाणार आहे. राज्याभिषेक समारोह संस्थेकडून ‘संभाजी महाराज बलिदान मास’ या विषयावर चित्ररथ मांडण्यात येणार आहे. समर्थ भारत व्यासपीठाच्या वतीने ‘समर्थ ठाणे, सशक्त भारत’ या विषयावर सिग्नल शाळा, वस्ती विकास प्रकल्प आणि घनकचरा व्यवस्थापन या उपक्रमांचे सादरीकरण चित्ररथातून केले जाणार आहे.

कलांकुर आर्ट फाउंडेशनकडून ‘वंदे मातरम्’ या विषयावर नृत्यकला सादर होणार आहे.

गावदेवी मैदानातील उपक्रम

गावदेवी मैदानात छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्कार भारतीकडून ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांनिमित्त महारांगोळी काढण्यात येणार आहे. तसेच य़ुनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील १२ किल्ल्यांच्या प्रतिकृती येथे पाहायला मिळणार आहेत.