ठाणे: गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष उन्मळून पडले, तर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्या. त्यातून निर्माण झालेला हरित कचरा तातडीने उचलण्यात येईल, अशी घोषणा महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली होती. मात्र, त्यानंतरही शहरातील विविध भागांत रस्त्यांच्या कडेला आणि पदपथांवर हरित कचऱ्याचे ढिग कायम असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. यावरुन पालिका प्रशासनाच्या कारभारावर टिका होत असताना आता मनसेही या मुद्यावर पालिका प्रशासनाला इशारा दिला आहे.

गेल्या आठवड्यात ठाण्यात झालेल्या मुसळधार पावसात अवघ्या २४ तासांत २०२ वृक्ष उन्मळून पडले, तर ४५ वृक्षांच्या फांद्या कोसळल्या. शहरातील नौपाडा, गोखले रोड, गडकरी रंगायतन चौक, के व्हिला, वृंदावन, चरई यासह अनेक ठिकाणी आजही तुटलेल्या फांद्या, झाडांचे खोड आणि इतर हरित कचरा रस्त्यांच्या कडेला व पदपथांवर पडून असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना पदपथांचा वापर करणे कठीण होत असून वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे.

वृक्ष उन्मळून पडलेल्या झाडांची छाटणी करून रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्याचे काम महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल आणि संबंधित विभागांच्या कर्मचाऱ्यांकडून केले जाते. तसेच हा हरित कचरा महापालिकेकडून उचलला जातो. मात्र, महापालिकेने रस्त्याच्या कडेला किंवा पदपथांवर असलेल्या या हरित कचऱ्याकडे दुर्लक्ष केल्याने महाराष्ट्र नवनर्माण सेना (मनसे) यांनी पालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.

मनसे नेते रविंद्र मोरे यांचा महापालिका प्रशासनाला थेट इशारा

मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी महापालिका प्रशासनावर टीका करत पाच दिवसांच्या आत शहरातील सर्व हरित कचरा उचलण्याची मागणी केली आहे. अन्यथा हा कचरा थेट महापालिका मुख्यालयात आणून टाकण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.