ठाणे : मुंबई हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार शनिवार सकाळपासून ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून सतत पडणाऱ्या पावसामुळे घोडबंदर घाट, मुंब्रा-शीळ मार्गावर गुडघाभर पाणी साठले आहे. याशिवाय, भिवंडीतील साईबाबा मंदीर रोड आणि अंजुर फाटा परिसरातही पाणी साठले आहे. या पाण्यातून वाट काढताना अवजड वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नेहमीपेक्षा कमी वाहने रस्त्यावर असल्याने फारशी कोंडी झालेली नाही.

ठाणे जिल्ह्यात बुधवारी झालेल्या पावसादरम्यान, मुंब्रा-शीळ-पनवेल रस्त्यांवर पाणी साठले होते. कंबरेभर साठलेल्या पाण्यात अनेक वाहने बुडाली होती आणि हा रस्ता वाहतूकीसाठी ठप्प झाला होता. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले होते. शनिवारी सकाळी हेच चित्र पुन्हा येथे दिसून आले. शनिवार सकाळपासून शहरात मुसळधार पाऊस पडत आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साठले असून मुंब्रा-शीळ रोडवरील कौसा ते शीळ दरम्यान पाणी साठले आहे. गुडघाभर पाण्यातून अवजड वाहनचालक वाट काढताना दिसत आहेत.

लहान वाहनांची वाहतूक मात्र ठप्प झाली आहे. रस्त्याकडेला असलेली उभी असलेली वाहने पाण्यात बुडाली आहेत. डोंगरातून येणाऱ्या पाण्याचा वेग जास्त असून त्यात खाडी भरतीवेळी या पाण्याचा निचरा होत नसल्याने येथे पाणी तुंबल्याचे बोलले जात आहे.

मुंबई -नाशिक महामार्गावरून भिवंडीकडे जाणाऱ्या साईबाबा मंदीर मार्गावरही पाणी साठले असून या मार्गावरही संथगतीने वाहतूक सुरू आहे. याशिवाय, कशेळी-काल्हेर मार्गावरील अंजुरफाटा येथेही पाणी साठले आहे. तसेच घोडबंदर मार्गावरील घाट परिसरात चेना पुलाजवळ गुडघाभर पाणी साठले आहे. यामुळे वाहतूकीवर परिणाम झाला आहे.

अवजड वाहनांची संथगतीने वाहतूक सुरू आहे, तर, लहान वाहनांची वाहतूक मात्र ठप्प झाली आहे. काही वाहने बंद पडली तर काही ठिकाणी वाहनचालकांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागला. जिल्ह्यातील महत्वाच्या मार्गावर पाणी साठल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेड अलर्ट इशाऱ्यामुळे अनेकांनी घरीच राहणे पसंत केले असून यामुळे नेहमीपेक्षा रस्त्यावर वाहने कमी आहेत. परंतु पाणी साठलेल्या ठिकाणी मात्र वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.