ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गढूळ पाण्याच पुरवठा आणि डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ठाणेकरांना महत्वाच्या सुचना केल्या आहेत. पिण्याचे पाणी उकळून वापरणे, परिसरात पाणी साचू न देणे, वैयक्तिक स्वच्छता राखणे, तसेच ताप, उलटी किंवा जुलाबाची लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस सुरू झाला. गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरात पाऊस सतत पडत आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साठत असून त्यात तेथून जाणाऱ्या गटार आणि मलनिस्सारण वाहिनीतील पाणी मिसळत आहे. तसेच प्राण्याचे मलमुत्रही पाण्यात मिसळते. याच पाण्यातून नागरिकांना वाट काढत जावे लागत आहे. अशा पाण्यामुळे लेप्टोस्पायरोसिसचा धोका वाढतो. साठलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होत आहे. डेंग्यू आणि मलेरियाचा धोका वाढतो. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आरोग्य विभागाने ठाणेकरांना समाजमाध्यमांद्वारे महत्वाच्या सुचना केल्या आहेत.

पाणी कमीत कमी १० मिनिटे उकळून गाळावे आणि हे शक्य नसल्यास द्रव क्लोरीन टाकून प्यावे. लेप्टो टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डॉक्सीसायकलीन औषध घ्यावे. उलटी, जुलाब, ताप अशी लक्षणे आढळल्यास त्वरीत औषधोपचार घ्यावा. शौचास जाऊन आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवा. बाळाला जुलाब झाल्यास क्षार संजीवनीचा वापर करा. पाणी साचल्यास निचरा करुन परिसर स्वच्छ ठेवावा.

हातपायाला जखम झाल्यास जंतूविरोधी मलम लावा. डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करा. वैयक्तीक स्वच्छता राखावी. ताप येताच वैद्यकीय सल्ला घ्या, असे आवाहन पालिकेने केले आहे. तसेच कोणताही ताप अंगावर काढू नका. उघड्यावरचे अन्नपदार्थ खाण्याचे टाळा. शिळे अन्न, खराब झालेली अथवा कापून ठेवलेली फळे खाऊ नका, असा सल्लाही पालिकेने दिला आहे.

पिण्याचे पाणी उकळून वापरणे, परिसरात पाणी साचू न देणे, वैयक्तिक स्वच्छता राखणे, तसेच ताप, उलटी किंवा जुलाबाची लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावा. डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टोस्पायरोसिसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने खबरदारी घ्यावी, असे आवाहन ठाणे महापालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. प्रसाद पाटील यांनी केले आहे.